
रामचंद्र गुहा नावाचा इसम मुळातच इतिहासकार कशाला मानला जातो, ते कोणाला ठाऊक नाही. अरूंधती रॉय या लेखिका किंवा टिस्ता सेटलवाड यांना समाजसेविका वगैरे बिरूदे कोणी दिली? तर तथाकथित माध्यमातून त्यांची सातत्याने जाहिरात करण्यात आली. तुम्हाला आठवत असेल तर भारतात टेलिव्हीजन पत्रकारिता सुरू झाली, ती स्टारन्युज वा एनडीटिव्ही यांच्या आरंभाने. म्हणजे स्टार नेटवर्कच्या वृत्तवाहिनीचे काम एनडीटिव्ही करीत होता. सर्व संपादकीय कामाचे कंत्राट या कंपनीकडे पुर्ण पाच वर्षे होते आणि तेव्हापासून असे इतिहासकार वा बुद्धीमंत देशाच्या डोक्यावर मारले गेले. याची आठवण एवढ्यासाठी करून द्यायची, की स्टार नेटवर्क परदेशी मालकीचे होते आणि सोनियांनी राजकारणात उडी घेताच या नेटवर्कने भारतातील पहिली वृत्तवाहिनी झटपट सुरू केली होती. सहाजिकच त्यामागचा हेतू सहज लक्षात येऊ शकतो. भाजपाचा देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदय आणि सोनियांचा राजकारणातील प्रवेश; एकाच वेळी योगायोगाने झालेले नाहीत. त्याच वेळी एका परदेशी नेटवर्कला भारतात वृत्तवाहिनी सुरू करायची उतावीळ झाली, हा देखील योगायोग असू शकत नाही. इतके झाल्यावर रामचंद्र गुहा किंवा तीस्ता वा अरुंधतीचे मार्केटींग कशाला झाले, त्याचा उलगडा होऊ शकतो. त्यांना समाजसेवक, कलावंत, प्राध्यापक, विश्लेषक, इतिहासकार म्हणून पेश करण्यातला एनडीटिव्हीचा पुढाकार समजणे सोपे जाते. ही पार्श्वभूमी विसरून गुहांच्या कुठल्याही बरळण्याचा विचार होऊ शकत नाही.
कालपरवा या इसमाने एक नवा शोध लावला. गुजरात हा आर्थिक कारणास्तव पुढारलेला प्रदेश असला तरी सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत मागासलेले राज्य आहे. त्याच्या उलट बंगाल हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले राज्य असले तरी सांस्कृतिक बाबतीत तो अत्यंत पुढारलेला प्रदेश आहे. हा शोध लावण्यासाठी रामचंद्र गुहा यांनी नेमके काय संशोधन केले? त्याचा थांगपत्ता नाही. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजराती असल्यावर गुजरातवर शिव्यांचा वर्षाव करण्याला अन्य काही पुराव्याची आवश्यकता अशा एनडीटिव्ही प्रणित बुद्धीमंतांना गरज वाटत नाही. ते कुठलेही आरोप करू शकतात आणि कसलेही लेबल लावून बदनामी करू शकतात. पुरातन काळात म्हणजे भारतात अस्पृष्यता अस्तित्वात होती, तेव्हा कुठल्याही पिछड्या वा दलिताने गुन्हा करण्याची गरज होती का? त्याने दलित असणे वा त्या जातीत जन्माला येणे, हाच त्याचा जन्मजात गुन्हा मानला जायचा. त्याला भेदभावानेच वागणूक देण्याला संस्कृती व सभ्यता मानले जात होते ना? आजही काळ फ़ारसा बदललेला नाही. आजही अस्पृष्यता तशीच आहे. फ़क्त आजच्या सुसंस्कृत पुरोगामी समाजातल्या सभ्यगृहस्थांसाठी वैचारिक संघटनात्मक निकषावर अस्पृष्यता पाळली जात असते आणि तिचे पालन करणार नाही, त्याला वाळीत टाकले जात असते. रामचंद्र गुहा अशाच सभ्य सुसंस्कृत समाजातील एक धुरीण आहेत. ‘जनेयु’धारी आहेत. इथे जनेयु म्हणजे समजून घेतले पाहिजे. जनेयु म्हणजे जानवे असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. हे जनेयु पुरोगामी असते.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजे ज ने यु! तर या नेहरू स्थापित विद्यापीठाची ज्याला मान्यता मिळेल, तोच सुसंस्कृत असतो आणि त्यांनी ज्याला अस्पृष्य घोषित केलेले असेल, त्याची सावलीही तुमच्या अंगावर पडली तर तुम्ही विटाळलेले असता. मग तुम्ही कला क्षेत्रातले कोणी दिग्गज असा किंवा राजकीय सामाजिक वा आर्थिक क्षेत्रात कितीही महत्वाचे कार्य केलेले का असेनात? जनेयुतल्या पुरोहितांनी तुम्हाला वाळित टाकण्याचा आदेश जारी केला, मग तुम्ही तात्काळ असंस्कृत झालेले असता. नरेंद्र मोदी वा एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा हे असे वाळित टाकलेले समाजघटक आहेत. सहाजिकच त्यांच्या संपर्कात येईल वा त्यांच्याशी व्यवहार करील, तो आपोआपच बहिष्कृत होत असतो. ही पार्श्वभूमी एकदा लक्षात घेतली, मग आपल्याला रामचंद्र गुहा इतिहासकार कसे झाले ते समजू शकते. किंवा त्यांना गुजरात श्रीमंत असूनही सांस्कृतिक बाबतीत मागास कशाला वाटतो, त्याचा उलगडा होऊ शकतो. त्याचा व्यवहारी वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नसतो. जो कोणी मोदींना शिव्याशाप देईल, तो तात्काळ बुद्धीमंत पंडित होऊन जातो आणि ज्याला मोदींमध्ये किरकोळही तथ्य आढळून आले, तरी तो अस्पृष्य होऊन जाणे स्वाभाविकच नाही काय? समाजातला अभिजनवर्ग किंवा तथाकथित सभ्यतेची हीच तर व्याख्या असते. ज्याला अन्य कुणाला तरी हिणवता येते किंवा तुच्छतेने वागवण्याची क्षमता असते, त्यालाच तर सभ्य सुसंस्कृत मानायचे असते. याचा अर्थ तो सभ्य वगैरे नसतो. दुसर्याला असंस्कृत ठरवण्यातून असल्या नाकर्त्या अभिजनांची संस्कृती सिद्ध होत असते. त्यांची सभ्यता अंगी बाणवण्यासाठीच तर नेहरूंनी ह्या नव्या जनेयुची निर्मिती केली आणि त्यात तयार झालेल्या पढतमुर्खांना जनेयु पंडित म्हणून जगभर ओळखले जाते.
रामचंद्र गुहांना अशा अकारण अवेळी गुजरातला शिव्या देण्याची इच्छा कशाला झाली असेल, त्याचे कारण मुळात समजून घेतले पाहिजे. रात्रीबेरात्री कोणी अंधारातून एकटाच वाटचाल करीत असताना घाबरलेला असतो. त्यावेळी तो जोराजोराने गाणी म्हणून लागतो. तेव्हा आपण एकटेच असल्याच्या भयाने त्याला पछाडलेले असते. म्हणूनच तो आपल्याच आवाजाला आधार सहकारी म्हणून जोरात गुणगुणत असतो. त्याचे विश्लेषण प्रोटेस्टंट पंथाचा मूळ संस्थापक मार्टीन लुथर याने छान समजावून सांगितले आहे. तो म्हणतो, जेव्हा मला देवाचे नावही घेण्याची इच्छा उरत नाही, तेव्हा मी माझा दुष्मन पोपचे स्मरण करतो. पोप हा कॅथलिक पंथाचा जागतिक प्रमुख आहे. त्याच्याच सत्तेला आव्हान देत मार्टिन ल्युथरने वेगळा खिश्चन पंथ स्थापन केला होता. पण आपल्याच धर्मविचाराविषयी शंका वाटू लागायची, तेव्हा देव किंवा गॉड आहे किंवा नाही, अशा शंका त्याच्या मनात यायच्या. त्या झटकून टाकायला त्याने शोधून काढलेला सोपा मार्ग म्हणजे पोपचे स्मरण. त्यामुळे काय व्हायचे? तर पोपच्या स्मरणाने मार्टीनच्या मनातला द्वेष उफ़ाळून यायचा. कॅथलिक पंथाविषयी त्याचा संताप जागृत व्हायचा. जितका तो संताप भडकत जाई तितकी मग त्या पाखंडापासून आपल्याला देवच मुक्ती देईल, अशी अपेक्षा जागृत व्हायची. पर्यायाने मार्टीनमध्ये देवाचा धावा करण्याची इच्छा प्रबळ व्हायची. अन्यथा त्याला देवाचा विसर पडलेला असायचा. मुद्दा इतकाच आहे, की जेव्हा तुमचाच तुमच्यावरचा विश्वास डळमळित होतो, तेव्हा आपल्या द्वेषाला जागवायचे असते.
द्वेषातूनच तुमचा भ्रम अधिक भक्कम करता येत असतो. लागोपाठ दुसर्यांदा नरेंद्र मोदींना भारतीय मतदाराने प्रचंड मतांनी देशाची सत्ता दिली, त्यातून गुहांसारख्या बहुतांश पुरोगाम्यांचा स्वत:वरचा आणि आपल्या विचारधारेवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यावरचा उपाय मोदी व गुजरातच्या नावाने शिव्याशाप असा झालेला आहे. आपण इतकी प्रसारमाध्यमे व बुद्धीजिवींचा प्रांत ढवळून काढला आणि एकामागून एक खोटेनाटे आरोप करून मोदींच्या विरोधातले काहूर माजवले; तरी सामान्य जनता मोदींच्याच मागे जाते? मोदींच्याच शब्दावर विश्वास ठेवते? मग आपले महान पुरोगामी विचार सेक्युलर भूमिका निरूपयोगी व निकामी आहे काय? अशा शंका जेव्हा व्याकुळ करून टाकतात, तेव्हा मोदीच खरा असल्याचा भयगंड मनाभोवती पिंगा घालू लागतो. त्यातून सुटका करून घेण्यासाठी देवाचा धावा करावा, तर देवाचे नाव घेण्याची गरज असते आणि मनात तर देवाविषयीच शंका आलेली असते. तेव्हा द्वेष प्रभावी औषध असते. मोदी हे नाव उच्चारले तरी कुठल्याही पुरोगाम्याचे मनातले गरळ उसळ्या घेऊ लागते आणि त्याला पुन्हा आवेशात भाजपा व संघाला शिव्याशाप देण्याची उर्जा आपोआप प्राप्त होत असते. सहाजिकच अशा नैराश्याच्या क्षणी त्यांना मार्टीन ल्युथरप्रमाणे आधी मोदीस्मरण करावेच लागत असते. त्यातून त्यांची सुटका नसते. एकवेळ मोदी समर्थक वा मोदीभक्त इतक्या आठवणीने मोदींचे नाव घेणार नाहीत किंवा त्यांचे गुणगान करणार नाहीत, इतक्या अगत्याने गुहांसारख्यांना मोदी वा गुजरातची निंदानालस्ती करणे अपरिहार्य असते.
गुहा हे पुरोगामी आहेत, म्हणून त्यांना टिकेचे लक्ष्य बनवले जाणे स्वाभाविक आहे. तो राजकीय वादविवादाचा भाग आहे. पण टिकेचा विषय वेगळा आणि गुहांसारख्यांना समजून घेणे वेगळे असते. त्यांची मनस्थिती समजून घेतली तर त्यांच्याकडून असे वक्तव्य कशाला येते, त्याचा खुलासा होऊ शकेल. ती त्यांची गरज आहे. आपल्यावरचाच विश्वास उडलेल्या माणसांना मनस्थिती स्थीर करण्यासाठी असे आधार शोधावेच लागत असतात. अन्यथा अवेळी व अकारण त्यांनी असा गुजरात बंगाल वाद लावण्याचे काहीही कारण नाही. आपण असे काही बोललो वा लिहीले तर तात्काळ भाजपावाले किंवा मोदी समर्थक आपल्यावर तुटून पडतील, याची गुहासारख्यांना पक्की खात्री असते. पण त्या शिव्याही त्यांच्या मनाला मोठा विरंगुळा देत असतात. आपण अस्तित्वात असल्याची दखल कोणीतरी घेतोय, याचेही समाधान अशा कालखंडात मोलाचे असते. त्याचा मनस्थिती समतोल करण्यासाठी मोठा उपयोग असतो. त्यामागे मोठे काही राजकारण शोधण्याची अजिबात गरज नाही. खरे सांगायचे तर मोदी व शहांना ही गरज कळते म्हणून तेही अशा गांजलेल्या पुरोगामी सेक्युलरांना अधूनमधून मदतीचा हात देत असतात. त्यांना प्रतिक्रीया देता येतील वा टिकेचा भडीमार करतील; असे मुद्देही पुरवित असतात. बुडत्याला काडीचा आधार म्हणावे तसे गुहा वगैरे मंडळी त्याच काडीवर काहीकाळ तग धरू शकतात आणि गुजराण करू शकतात. त्यांच्या गळ्यात असलेले विद्यापीठाचे जनेयु अजून उपयुक्त असल्याची जाणिव त्यांना मोठा धीर देत असते. बाकी त्यातून काहीही साध्य होत नाही आणि गुहांचीही तशी वेगळी अपेक्षा नसते.
तसे गुहा हे नेहरूंनी शोध लावलेल्या भारतातील आहेत. त्यांना नेहरूंपुर्वी भारत होता हेच ठाऊक नाही, तर त्याचा इतिहास तरी कशाला ठाऊक असेल? त्यांचा सगळा इतिहास वा संस्कृती वगैरे गोष्टी नेहरूंपासून सुरू होतात व राहुल गांधींपर्यंत येऊन संपतात. मध्यंतरी दोनचार वर्षापुर्वी राहुलच्या नाकर्तेपणाचा गुहांना इतका संताप आलेला होता, की त्यांनी राहुलने लग्न करावे आणि संसार थाटुन राजकारणातली लुडबुड थांबवावी; असाही आगंतुक सल्ला दिलेला होता. पण गुहांची एकूण व्यवहारी किंमत इतकी डबघाईला गेलेली आहे, की त्यांच्या सल्ल्याची राहुलना वा अन्य कोणा गांधी कुटुंबालाही उपयुक्तता वाटेनाशी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या अशा लग्नसरबराईची कोणीच फ़ारशी दखल घेतली नव्हती. निदान आपण आहोत याची दखल ममतांनी घ्यावी, अशी अपेक्षा असल्याने गुहांना बंगालची महान सांस्कृतिक आठवलेली असावी. आजकाल बंगालमध्ये काय स्थिती आहे, त्याचे वर्णन छापायलाही बंगाली पत्रकार बिचकतात. इतिहासाची गोष्ट वेगळी. मात्र ममता व पुरोगामी डाव्यांच्या सान्निध्यात बंगालची स्थिती कमालीची हलाखीची झाली आहे, याकडे गुहांनी लक्ष दिले असते तर बरे झाले असते. पण वर्तमानात यायचीच जर भिती असेल तर इतिहासात रमणे सोयीचे असते. त्यामुळे रामचंद्रजी आपल्या गुहेत दडून बसतात आणि इतिहास शोधू लागतात. बाहेर लॉकडाऊन असल्याने आपलीच शिकार ममता वा त्यांच्या तृणमूल झुंडीकडून होणार नाही; अशी खातरजमा करून घेतल्यावरच बहुधा त्यांनी गुहेच्या दाराशी येऊन अशी डरकाळी फ़ोडली असावी. त्यांची संस्कृती त्यांनाच लखलाभ होवो, असे गुजरातीच कशाला बंगाल्यांनाही आता वाटू लागले आहे. त्याची प्रचिती लोकसभेत आली आणि पुढल्या वर्षी विधानसभेतही येईलच.