दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । फलटण । “मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, भाडळी बु|| या संस्थेची स्थापना दि. २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे. याकामी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था फलटण), जिल्हा निबंधक सातारा, सहकार आयुक्त कार्यालय पुणे तसेच सहकार, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळेच ही स्वतंत्र सोसायटी स्थापन करणे शक्य झाल्याचे या सोसायटीचे संस्थापक चेअरमन मोहनराव साहेबराव डांगे यांनी सांगितले.
धोम – बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाद्वारे कृष्णेचे पाणी फलटण तालुक्यातील आदर्की ते आंदरुड या कायम दुष्काळी पट्टयात पोहोचल्याने हा संपूर्ण पट्टा बागायती होत असताना येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक अर्थ पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरील विविध योजना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह अन्य बॅंका सज्ज आहेत, त्यामुळे तालुक्यात ऊस, फळबाग व अन्य पिकांखालील क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे.
त्या पार्श्वभुमीवर या कायम दुष्काळी पट्टयातील, भाडळी बु|| आणि भाडळी खु|| या दोन गावांसाठी एकच विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी पुरेशी होणार नसल्याने महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना ग्रामस्थांनी साकडे घालुन भाडळी बु||, ता. फलटण गावांसाठी स्वतंत्र विकास सोसायटीची मागणी केली होती.
भाडळी बु||, ता. येथे फलटण येथे नव्याने मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., भाडळी बु|| कार्यान्वित झाली आहे, तथापि तेथे मातोश्री मजुर सहकारी संस्था लि., मातोश्री चॅरिटेबल ट्रस्ट भाडळी बु||, मातोश्री शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट,
जाणता राजा प्रतिष्ठान, नेहरु युवा मंडळ, भाडळी बु|| विकास आघाडी या संस्थांच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांसाठी अविरत काम सुरु आहे, त्यामध्ये योग्यवेळी विकास सोसायटी मिळाल्याने आता हे काम अधिक गतिमान होईल असा विश्वास मोहनराव डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.