स्थैर्य, हिंगोली, दि.०३: हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील मध्ये छताचा काही भाग मंगळवारी (ता. २) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोसळाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र हा प्रकार गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात मागील आठवडाभरापासून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हिंगोली शहरातील रुग्णांची संख्या मोठी असल्याने या रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्ड मध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. सध्याच्या स्थितीवर हिंगोली जिल्ह्यात तब्बल २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये बहुतांश रुग्ण हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहेत.
या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या एका वॉर्ड मध्ये सात ते आठ बेड टाकून त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहे. तर काही रुग्णांवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील वार्डच्या छताचा भाग अचानक कोसळला. वॉर्डमध्ये अचानक मोठा आवाज झाल्याने रुग्णही घाबरून गेले. काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी रुग्णांनी केलेल्या पाहणीत छताचा काही भाग कोसळल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणताही रुग्ण जखमी झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर एस भागातही छताचा काही भाग फुगलेला असल्याने तो भागही कुठल्याही क्षणी कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून शासकीय रुग्णालयाच्या निकृष्ट बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. छताच्या प्लास्टरचा पापुद्रा कोसळल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालयात लगेच पाहणी करण्यासाठी जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.