
हिंगणगाव जिल्हा परिषद गटात राजे गटाला मोठा धक्का बसला असून विविध गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
स्थैर्य, हिंगणगाव, दि. 19 जानेवारी : हिंगणगाव जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे बदलणारी घडामोड समोर आली असून राजे गटाला मोठे भगदाड पडल्याची माहिती आळजापूरचे माजी सरपंच शुभम नलवडे यांनी दिली आहे. हिंगणगाव, कोऱ्हाळे, कापशी, मलवडी, बिबी आणि पिराचीवाडी या गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
बिबी येथे आयोजित भाजपा महायुतीच्या स्नेहमेळाव्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले. या सामूहिक प्रवेशामुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गटात राजे गटाच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
या पक्षप्रवेशात हिंगणगाव येथील युवा नेते मच्छिंद्र संपत भोईटे, कोऱ्हाळे गावचे विद्यमान सरपंच दिपक रावसो शिंदे व सत्यवान नलवडे (फौजी) यांचा समावेश आहे. कापशी गावचे नेते महादेव सुळ (माजी सरपंच), शिवाजी गार्डे, तसेच युवा नेते ज्योतीराम दडस व जयवंत दडस यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
बिबी गावच्या सोसायटीच्या उपाध्यक्ष पुष्पा बापूसो बोबडे, पिराचीवाडीचे ग्रामपंचायत सदस्य जिजाबा जगताप, सतीश बागल, योगेश बागल, तसेच मलवडी येथील ग्रामपंचायत सदस्य हिम्मत तरडे, कांताराम तरडे आणि मदन तरडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
या घडामोडीमुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गटात भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

