दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । हिंगणगाव, ता. फलटण येथील युवा अभियंता व रक्षा संपदा खात्यामधील उप विभागीय अधिकारी आदित्य चंद्रशेखर गुरव यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील सर्वात जास्त रक्षाभूमी असणाऱ्या जबलपुर विभागाची सॅटेलाईट मोजणी व अनुषांगीक कामे विक्रमी वेळेत गुणवत्तापूर्वक केल्यामुळे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करणेत आला. आदित्य गुरव सामान्य परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन, अत्यंत कमी वयात या पदावर नियुक्त झाले आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ॲाफ इंजिनीयरींग, फलटणचे माजी विद्यार्थी असलेल्या आदित्य गुरव यांनी सातारा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात अभियंता म्हणून उत्तम काम केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते सत्काराचे वृत्त येथे पोहोचताच हिंगणगाव व पंचक्रोशीत आदित्य गुरव यांच्या कर्तृत्वाबद्दल समाधान व्यक्त करीत समाजमाध्यमांद्वारे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदित्य गुरव यांच्या या कार्याचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.