स्थैर्य, फलटण, दि. २९ : हिंगणगाव विलगीकरण कक्षाचे कामकाज हे एकदम कौतुकास्पद आहे. हिंगणगाव विलगीकरण कक्षामध्ये कोरोनाबाधित रूग्णांना लोकवर्गणीतून विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना उपचारादरम्यान मनोरंजनासाठी साउंड सिस्टीमच्या आधारे किर्तन व इतर कार्यक्रम कोरोनाबाधित रूग्णांना ऐकवले जात आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्यात नवचैतन्य निर्माण होत आहे. हा हिंगणगाव पॅटर्न संपुर्ण सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
हिंगणगाव विलगीकरण कक्षास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, डॉ. माने, डॉ. भापकर, डॉ. सौ. अजिता नाईक – निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य विलगीकरण कक्षास लाभत आहे, त्यांचेही कौतुक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.