
स्थैर्य, सातारा, दि. 12 नोव्हेंबर : शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूलमधील दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पाची राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), नवी दिल्ली यांच्या ‘प्रयास 2025-26’ या प्रतिष्ठित योजनेंतर्गत निवड झाली आहे.
या योजनेंतर्गत संपूर्ण देशभरातून केवळ 38 शाळांची निवड करण्यात आली असून, त्यात हिंदवी स्कूलचा समावेश झाला. नैसर्गिक रंगद्रव्यांनी समृद्ध तुतीची पाने रेशीम अळ्यांना खाऊ घालून नैसर्गिकरीत्या रंगीत रेशीम तयार करणे असे प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाचे शालेय मार्गदर्शन मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर यांनी केले असून, तांत्रिक मार्गदर्शन डॉ. सविता नलवडे (डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव) यांनी केले आहे, तसेच उच्च शिक्षण संस्था म्हणून हिंदवी रिसर्च सेंटर, सातारा यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचा शाळेमध्ये नुकताच गौरव समारंभ झाला. यावेळी दातार शेंदूर स्कूलचे अध्यक्ष अनंतराव जोशी, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशाधारीत गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, हिंदवी रिसर्च सेंटरचे डॉ. विश्वास देशपांडे, डॉ. सविता नलवडे, डी. पी. भोसले कॉलेजचे प्राचार्य प्रा. एल. डी. कदम, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, हिंदवी रिसर्च सेंटरचे समन्वयक अभिजित पठारे, संदीप जाधव व शिक्षक उपस्थित होते.
अनंतराव जोशी म्हणाले, “हा प्रकल्प केवळ प्रयोग नाही, तर टिकाऊ भविष्यासाठी एक उपयुक्त दिशा आहे.” श्री. कुलकर्णी म्हणाले, “हिंदवी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रात नवे पाऊल टाकत आहेत, ही केवळ शाळेचीच नव्हे, तर सातार्याची शान आहे.”
डॉ. विश्वास देशपांडे म्हणाले, “या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन विकसित होईल. हिंदवी रिसर्च सेंटरचे ध्येय म्हणजे शालेयस्तरावर संशोधन संस्कृती रुजवणे असून, हा प्रकल्प त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.” विभाग प्रमुख शिल्पिता मांगडे यांनी सूत्रसंचालन केले.

