दैनिक स्थैर्य | दि. १५ जानेवारी २०२५ | फलटण |
पालक व विद्यार्थ्यांची मागणी आणि त्यांच्या सोयीसाठी साखरवाडी विद्यालय येथे उच्च माध्यमिक शिक्षणाचे वर्ग सुरू करण्याची घोषणा साखरवाडी शिक्षण संस्था विश्वस्त समिती अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केली आहे.
साखरवाडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांचे ७९ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना प्रल्हादराव साळुंखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील होते. प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी नंदकुमार कुलकर्णी, अनिल पटवर्धन व आयर्वेदाचार्य हरिष पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक राजेंद्र भोसले, राजेंद्र शेवाळे, कौशल भोसले, सचिव सौ. उर्मिला जगदाळे, माजी मुख्याध्यापक प्र. नि. बोंद्रे, संपत चांगण, पर्यवेक्षक तु. ध. बागडे, संदीप चांगण, विद्या चांदगुडे यांचेसह निवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखरवाडी शिक्षण संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता जपण्याबरोबर स्पर्धा परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी केली असून या संस्थेचे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी क्रीडा स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवर गुणवत्तापूर्ण खेळात यशस्वी झाले असल्याचेही प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
नंदकुमार कुलकर्णी म्हणाले, आम्ही या शाळेत शिकताना जे शिक्षण व संस्कार मिळाले, त्या मजबूत पायावरच आमची जडणघडण झाली व उच्च शिखर गाठता आले. या शाळेसाठी आमच्या मनात एक कप्पा असून सर्व आठवणी त्यामध्ये जतन केल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा दुरुपयोग टाळावा, खेळ व आरोग्य उत्तम राखून उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन यावेळी नंदकुमार कुलकर्णी यांनी केले.
अनिल पटवर्धन म्हणाले, या शाळेत शिकताना प्रत्येक उपक्रमात आमचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे, यावरच आयुष्यात उच्च शिखर गाठता येते. प्रशाला व येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सुसज्ज प्रसाधनगृह आपल्या सहकार्यांमार्फत बांधून देण्याचे यावेळी अनिल पटवर्धन यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे टाळयांच्या गजरात स्वागत झाले.
हरिष पाटणकर म्हणाले, साखरवाडी ही सांस्कृतिक राजधानी आहे. या परिसराच्या संस्काराने आपल्याला परदेशी जाण्याची संधी मिळाली, उच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी यश मिळवितातच; परंतु कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता व्यावसायिक शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. विद्यार्थीनींनी उत्कृष्ट ईशस्तवन सादर केले. प्रमुख मान्यवरांना संविधान प्रत, शाल, बुके देवून सन्मानित करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय नितीन शिंदे व मिंलीद फडतरे यांनी करून दिला.
यावेळी मार्च २०२४ मधील गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृती परीक्षा, विविध क्रिडा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. पारितोषिके देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
आदर्श शिक्षक महादेव बाबा लांडगे, विलास सदाशिव जाधव, रोहिदास बापू गावित, सौ. मनिषा गाडेकर, सौ. शुभांगी भोईटे, सौ. अर्चना रणवरे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत शिक्षक संजय जिजाबा बोडरे व हरिदास दिगंबर सावंत यांनाही सन्मानित करण्यात आले.
करमणुकीच्या कार्यक्रमात ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यावेळी मोठ्या संख्येने पालक आणि साखरवाडी व परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
माजी विद्यार्थी सुहास पटवर्धवन यांनी शाळेस १० हजार रुपये देणगी दिली. प्रकाश सांवत्सरिकचे प्रकाशन करण्यात आले.