स्थैर्य, रत्नागिरी, दि.१९: तोक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व संबधित भागातील नागरिकांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष बंड्या साळवी, उपजिल्हाधिकारी राजेश्री मोरे, तहसिलदार शशिकांत जाधव तसेच संबधित विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, प्रशासन तत्परतेने काम करत असून नुकसानग्रस्त भागामध्ये नुकसानीचे पंचनाम्याचे काम सुरु झाले आहे. आपण ज्या नुकसानग्रस्त भागांमध्ये भेट देऊन आढावा घेतला त्याठिकाणी पंचनामे सुरु झाले आहेत. संबंधित विभागाने पंचनाम्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
निसर्ग चक्रीवादळासारखे शासन निर्णय काढून याही वेळी नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली असल्याचे ते म्हणाले नाणीज, खानू पाली, हातखंबा, शिवरे आंबेरे, गावडे आंबेरे, पावस, कोळंबे, भाट्ये, कर्ला, नेवरे मालगुंड आदि नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी बाधितांचे घर, गोठे, पशुधन, झाडांची पडझड आदि नुकसानीबाबतचा आढावा घेतला व शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.