Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.

माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑकटोबर २०२२ । सातारा । समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे काम माध्यमांनी करावे असे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 2022 च्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते.

पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले. निर्भीड पत्रकारितेसाठी ते गरजेचे आहे. पत्रकारितेतील सुरुवातीच्या काळासाठी त्यांना काही विद्यावेतन देता येईल का ? याचाही अभ्यास करु. पत्रकारांना आरोग्य, मुलांना शिक्षण तसेच राहण्यासाठी घरे याबरोबर जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश
स्पर्धात्मक युगात डिजीटल मीडियाने विश्वासहार्ता निर्माण करणे गरजेचे
कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहचविण्याचे काम डिजीटल मीडिया करीत आहे. डिजीटल मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक जोडलेली आहेत. तरी या माहिती पोहचविण्याच्या स्पर्धात्मक युगात डिजीटल मीडियानी आपली विश्वासहार्ता निर्माण करावी. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनास दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे संदेशात पुढे म्हणाले, पुस्तक व डिजीटल अशी दोन्ही माध्यम आज अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. कोरोना संकटाच्या काळात डिजीटल मीडियाने चांगली कामगिरी करुन नागरिकांना जागृत करण्यासोबतच धीर देण्याचे मोठे काम केले आहे. विविध सुविधांसाठी संघटनेने एक आदर्श नियमावली व आचार संहिता तयार करावी. सत्यता, सभ्यता व लोकाभिमुखता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून मीडियाचा विस्तार करावा. लोकांपर्यंत क्षणार्धात माहिती पोहचविण्याचे हे साधन आहे. या क्षेत्रातील संपादक पत्रकारांच्या समस्या या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत नक्की पोहचतील. डिजीटल मीडियातील बांधवांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा निश्चित पणे प्रयत्न करु, असेही ते यावेळी संदेशात म्हणाले.

टेंभू येथील गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करु – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, संघटनेने स्थानिक स्तरावर नियमावली तयार करुन द्यावी. त्या आधारे त्यांना अधिकृत म्हणून ओळखपत्र देण्याविषयी कार्यवाही करता येईल. टेंभू ता. कराड येथील गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक व्हावे, अशी पत्रकारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करुन ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याशी चर्चा करुन या स्मारकाविषयी असलेल्या अडचणी सोडवून ते नक्की मार्गी लावू.

डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल पत्रकारिता ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहेत. माध्यमाची पोहोच आणि गतीमानता ही बलस्थाने लक्षात घेवून डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे आहे. लोकशाही मुल्यांच्या जपणुकीसाठी माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण आहे. आज झालेल्या अधिवेशनात ज्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचा सकारात्मक विचार करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

खासदार श्री. पाटील म्हणाले, पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. आजची पत्रकारिता बदलली असून त्याला आधुनिकतेची जोड मिळत आहे. पत्रकारांनी सत्याला वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी.

संघटनेचे अध्यक्ष श्री. माने यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेची भूमिका विषद करुन डिजीटल माध्यमांचे महत्व सांगितले. तसेच त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या या विषयी माहिती दिली. तसेच डिजीटल मीडियाच्या प्रतिनिधी कोण चुकत असेल तर त्या चुकाही वेळीच निर्देशनास आणून द्याव्यात, असेही ते म्हणाले.

यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तसेच डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्मरणिका, पुस्तक व विविध दिवाळी अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!