स्थैर्य, नागपूर, दि. 29 : कुख्यात गुंड अरूण गवळीला नागपूर हायकोर्टाने दणका दिला असून पाच दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचा आदेश दिला आहे. अरुण गवळीने 24 तासांत मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्याची परवानगी मागावी. ती परवानगी एका दिवसात मंजूर करावी आणि त्यानंतर तीन दिवसात अरुण गवळीने नागपूर गाठावे, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही याचिका स्विकारली जाणार नाही, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
याआधी हायकोर्टाने अरुण गवळी याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार दिला होता. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. अरुण गवळीने पॅरोलसाठी अर्ज करताना आपण कोणतंही गैरकृत्य तसंच लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तिवाद केला होता. पण न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचं उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही असं सांगितलं. तसंच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचं खंडपीठाने नमूद केलं होतं. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी ते नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे अरुण गवळी जवळपास 45 दिवसांसाठी पॅरोलवर नागपूर कारागृहातून बाहेर आला होता. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27 एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं. पण याचवेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने अर्ज स्विकारत 10 मे पर्यंत अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत 24 मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. न्यायालयाने पॅरोलमध्ये अजून वाढ देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान पॅरोलवर बाहेर असताना अरुण गवळीची योगिताचा विवाहसोहळा पार पडला. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अत्यंत साध्या पद्धतीने दगडी चाळीमध्येच हा विवाह पार पडला. योगिता अभिनेता अक्षय वाघमारेसोबत विवाहबद्ध झाली.