दिवाळीत दोन जैन मंदिरे खुली ठेवण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.११ : धनत्रयोदशी ते भाऊबीज या दिवाळीच्या पाच दिवसांत मुंबईतील दोन जैन मंदिरे खुली ठेवण्याची परवानगी उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली. दिवाळीच्या मुहूर्तावर शहरातील १०२ जैन मंदिरे खुली ठेवण्याची परवानगी मागण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती.

जैन मंदिर ट्रस्टच्या याचिकेवर न्या. एस.जे. काथावाला व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी होती. जैन बांधवांमध्ये दिवाळीचे पाच दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे या दिवशी जैन मंदिरे खुली करण्याची परवानगी द्यावी, असे याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश शहा यांनी सांगितले.

याआधीच्या उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा हवाला देत जैन समाजाला सार्वजनिकपणे त्यांचे धार्मिक सण साजरे करण्याची आणि कोरोनाच्या काळात तीन मंदिरे खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. लॉकडाऊनचे नियम पाळून व सामाजिक अंतराचे भान राखूनच भाविक मंदिरात प्रवेश करू शकतील. त्यामुळे शहरातील १०२ मंदिरे खुली ठेवण्याची परवानगी राज्य सरकारला देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. राज्य सरकारने बार, रेस्टॉरंट आणि थिएटर सुरू करण्याची परवानगी दिली. मंदिरे खुली करण्याची परवानगी न देणे अन्यायकारक ठरेल, असा युक्तिवादही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला.

राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी यावर आक्षेप घेतला. केवळ जैन समाजासाठीच दिवाळी महत्त्वाची आणि शुभ आहे, हे तथ्यहीन आहे. त्यामुळे याचिकाकर्ते केवळ त्यांच्याच समाजासाठी दिलासा मागू शकत नाहीत. ही जनहित याचिका नाही, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!