दैनिक स्थैर्य | दि. 17 जुन 2024 | फलटण | गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्याच्या विविध गावांमध्ये रात्रीचे ड्रोन कॅमेरा फिरत आहेत. नक्की हे ड्रोन कॅमेरे कशासाठी फिरत आहेत याचे उत्तर मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे मिळालेले नाही. फलटण पोलीस प्रशासन सुद्धा ड्रोन कॅमेऱ्याच्या बाबतीत अतिशय प्रभावीपणे कारण शोधत आहेत. अद्याप तरी पोलिसांना सुद्धा नक्की ड्रोन कॅमेरे का फिरतात? याचे उत्तर मिळालेलं नाही.
साधारण गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बारामती तालुक्यामध्ये ड्रोन कॅमेरे फिरायला लागले होते. त्यानंतर फलटण तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये ड्रोन कॅमेरे दिसायला लागले. ते दिसल्यानंतर गावकरी सतर्क झाले. गावकऱ्यांनी पोलिसांच्या व स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने रात्रगस्त सुरू केले यासोबतच ज्या गावांमध्ये ड्रोन कॅमेरे दिसतील त्या गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण गावाला अलर्ट देण्यात आला. अशा घटना फलटण तालुक्याच्या विविध गावांमध्ये नियमित होताना दिसून येत आहेत.
आपल्या गावामध्ये ड्रोन कॅमेरे फिरत असल्यामुळे अनेक जण असा कयास लावत आहेत की; ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून चोरटे रेकी करत आहेत. परंतु ड्रोन कॅमेरे फिरायला लागल्यापासून ड्रोन कॅमेराच्या साह्याने रेखी करून चोरी केल्याची घटना समोर आलेली नाही; किंवा पोलीस प्रशासनामध्ये याची अद्याप नोंद झालेली नाही.
चोरी केल्याची घटना समोर न आल्यामुळे अनेक जण असे म्हणत आहेत की; कोणती तरी एजन्सी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सर्वे करत असेल. जर संबंधित एजन्सी सर्वे करीत असेल तर अनेक प्रश्न पुढे उभे राहतात. यामध्ये रात्रीचेच ड्रोन कॅमेरे बाहेर काढून सर्वे का करत आहेत? जर शासकीय सर्वे असेल तर याची नोंद शासकीय यंत्रणेमध्ये का नाही? असे सवाल उपस्थित राहत असल्याने नक्की सर्वे करण्यासाठी ड्रोन कॅमेरे वापरत असल्याची शक्यता धूसर होत आहे.
यासोबतच एका वृत्तपत्राचे कात्रण सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. बारामती येथे असणाऱ्या विमान प्रशिक्षण केंद्रामधून ऍडमिशन घेतलेल्या नूतन वैमानिकांना रात्रीचे विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. जर बारामती विमान प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण दिले जात असेल; तर त्याची नोंद संबंधित शासकीय यंत्रणेकडे असणे अनिवार्य आहे. याबाबतची नोंद नक्कीच पोलीस प्रशासनाला सहजरीत्या मिळाली असती; परंतु अद्याप तरी तशी कोणतीही नोंद पोलिसांकडे असल्याची खात्रीशीर वृत्त समोर आलेले नाही.