दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | बारामती |
एसटी कर्मचारी प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देत असताना रात्रंदिवस काम करतो; परंतु त्याला अत्यल्प वेतन मिळते. ही खेदजनक बाब असून येणार्या काळात प्रत्येक कर्मचार्याला सुगीचे दिवस यावेत, अशी अपेक्षा बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी केले.
एसटी महामंडळाच्या बारामती विभागीय कार्यशाळा येथील गुणवंत कर्मचारी हेरंब कमलाकर लोणकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार व गुणवंत कर्मचारी पुरस्कार सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सातव बोलत होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, माजी नगरसेवक सूरज सातव, यंत्र अभियंता महेश वाघमोडे, वाहतूक अधीक्षक घन:श्याम शिंदे, कसबा प्रबोधिनीचे अध्यक्ष राजू देशपांडे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष महेश सावंत, पोपटराव ढवाण, अरविंद सातव, सुनील जाधव, अविनाश रणसिंग, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले व काशीविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा येथील पदाधिकारी व एसटी अधिकारी, कर्मचारी यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
अपंग कर्मचारी असतानासुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या बळावर विविध क्षेत्रात यश मिळवले. कौटुंबिक जबाबदार्या पूर्ण केल्या व एसटीचे प्रवासी वाढावेत म्हणून कार्य केले. उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण एसटीची सेवा केल्यानेच हेरंब लोणकर गुणवंत झाल्याचे मान्यवरांनी मनोगतामध्ये सांगितले.
यावेळी अपंग कर्मचारी हेरंब लोणकर यांचा सपत्नीक सत्कार सचिन सातव व इतर मान्यवरांनी केला.
प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले तर आभार सोमनाथ गायकवाड यांनी मानले.