यापुढे ओबीसी नेत्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर जशास तसे उत्तर देऊ – बापूराव शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२३ | फलटण |
संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आमच्या नेत्यांवर विविध माध्यमातून पातळी सोडून हल्ले होत आहेत. मंत्री ना. छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर व इतर सर्वच ओबीसी नेत्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर जशास तसे उत्तर देऊ. ओबीसी नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आहे त्याचा फलटण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो, असा इशारा ओबीसी संघर्ष समितीचे बापूराव शिंदे यांनी फलटण येथील नाना पाटील चौक येथे रास्ता रोको वेळी दिला.

ओबीसी नेते व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने भ्याड हल्ला केल्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इंदापूर येथे दोन दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी आज ओबीसी समाजातर्फे फलटण बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाची विनंती आणि फलटणची यात्रा म्हणजेच प्रभू श्रीराम रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर फलटण बंद आंदोलन मागे घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांच्या वतीने घेण्यात आला होता.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. पुणे पंढरपूर बाजूकडे जाणारी-येणारी वाहने रोखण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. या रस्ता रोकोमुळे चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांचे वरील हल्ला प्रकरणी आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यापुढे जर कोणी ओबीसी नेत्यांचे केसाला जर धक्का लावला तर सहन केले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला व उपस्थित आंदोलकांनी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जेष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शिवसेनेचे नेते नानासाहेब इवरे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव, गोविंद भुजबळ, कोळकी गावचे उपसरपंच विकास नाळे, आमिर शेख, प्रवीण फरांदे यांनी यापुढे अशा घटना घडल्यास ओबीसी समाज एकत्रित उत्तर देईल, असे मत व्यक्त केले. विविध सामाजिक संघटना, महात्मा फुले जयंती उत्सव समिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती, ओबीसी संघर्ष समिती, समता परिषद फलटण यांचा सक्रिय सहभाग होता.

आंदोलनकर्ते यांच्यातर्फे यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!