
स्थैर्य, फलटण, दि. 13 सप्टेंबर : प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनचे माजी विद्यार्थी आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले प्रतिथयश व्यावसायिक, श्री. संग्राम लिंबाजी राऊत यांनी आपल्या मातृसंस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘आपली शाळा’ येथील बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी सकस आहार योजनेकरिता भरीव अर्थसहाय्य दिले आहे.
श्री. राऊत यांचे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांचा गरजूंना मदत करण्याचा वसा ते अविरतपणे चालवत आहेत. या देणगीमागील भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “माझ्या शाळेने आणि मॅक्सिन आजी, मंजुताई, जगदाळे सर यांसारख्या गुरुजनांनी मला भरभरून दिले. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पर्यावरणाचे प्रेम आणि जात-धर्मविरहित मानवतेचे नाते जपायला शिकवले. मी शाळेचा खूप ऋणी आहे आणि याच भावनेतून ही मदत करत आहे.”
श्री. राऊत यांच्या या अर्थसहाय्यातून ‘आपली शाळा’ येथील बालवाडीच्या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी सकस नाश्ता दिला जात आहे. या नाश्त्यामध्ये उसळ, अंडी, हंगामी फळे, लाडू आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे, ज्यामुळे या लहान मुलांच्या आरोग्याला आणि पोषणाला मोठी मदत होत आहे.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल बालवाडीच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी यांनी श्री. संग्राम राऊत यांचे आभार मानले आहेत, तर विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.