दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । सातारा । मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. सातारा जिल्हयातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, महामंडळे, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व इतर नागरिक यांना सूचित करण्यात येते की, जनतेस मार्गदर्शन ठरावे यादृष्टीने तसेच स्वतःच्या व सहप्रवाशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यालयात येताना-जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. मोटार वाहन चालविताना शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी यांचे आद्य कर्तव्य आहे.
दुचाकी वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी, कर्मचारी, नागरिक हे मोटार वाहन अधिनियम, 1988 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 129 चे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल असे आदेश आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती साताराचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.