स्थैर्य, पाटण, दि. ३० : हेळगावने नेहमीच अध्यात्माची कास धरत गावात धार्मिक व एकीचे वातावरण जपले आहे. गावातील पारायण सोहळा असो, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव किंवा मासिक एकादशी कार्यक्रम असो, हे सर्व उत्सव समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. या धार्मिक कार्यक्रमांमुळे भावी पिढीला त्याचा उपयोग होणार असून हेळगावने अध्यात्माची ही परंपरा कायम राखावी, असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघटनेचे संस्थापक ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केले.
हेळगाव, ता. कराड येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर स्थलांतराच्या भूमिपूजनप्रसंगी ते बालत होते. यावेळी सरपंच सौ. शारदा जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक संकपाळ, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, विकास सोसायटीचे संचालक सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य ओंकार उर्फ कौस्तुभ सूर्यवंशी व विक्रम कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ह. भ. प. बंडातात्या कराडकर म्हणाले, हेळगाव ग्रामस्थांनी सर्व देवतांची मंदिरे एकाच ठिकाणी घेऊन सुसज्ज सभागृह उभारले आहे. विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांना परवडेल, असे हे सभागृह हेळगावसह परिसरातील जनतेला किफायतशीर ठरेल.
यावेळी ह. भ. प. बंडातात्या कराडकर, नामदेव पवार, सरपंच शारदा जाधव, ह. भ. प. काकासाहेब सूर्यवंशी, सुरेश पाटील व सुभाष पाटील मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला. माजी सरपंच बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ह. भ. प. सुरेश पाटील यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य विक्रम कुमार यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक मिलिंद पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन अशोक चव्हाण, सदाशिव पवार, हणमंत पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी, सुरेश शिंदे, रामचंद्र पाटील, प्रज्योत कुलकर्णी, सुभाष कदम, बापूराव संकपाळ, अनिल कणसे, सचिन सूर्यवंशी, अजय सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.