फलटण शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,फलटण, दि.२१: शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटत आहे. दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटला अन् वीजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात व उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.

दुपारी तीन वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाल्याने उकड्याचा अधिक त्रास जाणवत होता. घरात असतानासुध्दा उकाड्याने घामाघुम झाले. दुपारी साडेचार वाजेपासून वातावरणात अचानकपणे बदल झाला आणि आकाशात ढगांनी अधिकच गर्दी केली. सोसाट्याचा वादळी वारा सुटला. आकाशात वीजा चमकू लागल्या अन् ढगांचा गडगडाटही वाढला. काही वेळेतच शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरूवात झाली. महात्मा फुले चौक, डी. एड. कॉलेज चौक, पृथ्वी चौक व कोळकी या भागात पावसाचा वेग अधिक राहिला तर विडणीमध्येही जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. तालुक्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही वेळेतच रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.

साडेचार वाजेपासून टपोरे थेंब पडण्यास सुरूवात झाली अन् काही मिनिटांतच सरी कोसळू लागल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांसह दुकानदारांची त्रेधातिरपिट उडाली. वादळी वारा सुटताच शहरासह उपनगरांमधील विद्युतपुरवठा महावितरणकडून नेहमीप्रमाणे खंडीत करण्यात आला होता. वादळी वारा थांबताच पुन्हा वीजपुरवठा पुर्ववत केला गेला. पावसाने उघडीप देताच काही उपनगरीय परिसरांमध्ये अस्ताला जाणाऱ्या सुर्यनारायणाने दर्शन दिल्याने अल्हाददायक वातावरण अनुभवयास आले.

मागील काही दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना संध्याकाळनंतर दिलासा मिळाला. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होत होती; मात्र पावसामुळे रविवारी नागरिकांना अल्हाददायक वातावरणाने दिलासा मिळाला.


Back to top button
Don`t copy text!