
स्थैर्य, फलटण दि. २७: फलटण शहर आणि तालुक्याच्या काही भागात आज दुपारी ४.३० पासून सुमारे २ तास जोरदार पाऊस झाला, काही प्रमाणात गारा पडल्याने वातावरणात बदल झाला आहे, अजूनही पाऊस सुरु आहे.
प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब, भाजीपाला, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अचानक आलेल्या पाऊस व गारांमुळे भितीचे सावट आहे, मात्र प्रामुख्याने ही पिके असलेल्या भागात पाऊस झाला नसल्याने भिती कमी झाली आहे.
सोमवारी दुपारी सुरु झालेला पाऊस मुख्यतः राजाळे ते सांगवी या बागायती पट्ट्यात तसेच जिरायती पट्ट्यातील सासकल, भाडळी खुर्द, बुद्रुक, दुधेबावी, विंचुरणी, वाठार निंबाळकर, खडकी, मिरगाव, निंभोरे, आरडगाव, हिंगणगाव वगैरे भागात अधिक पाऊस झाला आहे.
गिरवी, निरगुडी भागात द्राक्ष, डाळींब बागा आहेत तर पिंप्रद भागात उशीराचे कांदा पिक घेतले जाते, साखरवाडी, होळ, जिंती, फडतरवाडी, खामगाव, मुरुम वगैरे भागात उन्हाळी टोमॅटो पीक सुमारे १२०/१२५ हेक्टरवर घेतले जाते मात्र या भागात पावसाचा जोर नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी सुखावला आहे.
फलटण शहर व परिसरात सुमारे अडीच तीन तास चांगला पाऊस झाला आहे, सुमारे १० ते १५ मि. मी. पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.