
दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । फलटण । फलटण तालुक्याच्या पूर्व भागात खरीपाच्या पिकांसाठी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात होता. पावसाने ओढदिल्याने उभ्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. निरा उजव्या कालव्यावर अवलंबून असणारे शेतकरी कालव्याचे पाणी नेमके कधी सुटणार याची वाट पहात होते. मात्र गेल्या 2/3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
फलटण पूर्व भागातील जिरायती पट्ट्यात महिना दिडमहिन्यापूर्वी पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्या होत्या. बागायती पट्ट्यात निरा उजवा कालवा व नीरा नदीवरील उपसा सिंचन योजनांद्वारे ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या उसाच्या लागणी होत आल्या आहेत तर काही ठिकाणी सुरु आहेत. मात्र अशा लगबगीत नेमके कालव्याचे रोटेशन वाढले आणि त्यातून शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्यामुळे गेल्या 2-3 दिवसांपासून सुरु झालेला पाऊस शेतकर्यांची चिंता मिटवून टाकणारा ठरत आहे.