
दैनिक स्थैर्य । 26 मे 2025। फलटण । गिरवी परिसरात गेले 72 तास मुसळधार पावसाचे तांडव सुरु आहे. पावसाने रुद्रावतार धारण केल्याने गिरवी, बोडकेवाडी, जाधववाडा, धुमाळवाडी, निरगुडी, सासकल या भागातील घराची पडझड झाली आहे. झाडे व शेत जमीन वाहून गेली. शेतीची बांधबंदिस्ती फुटून पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
गिरवी परिसरातील लहान मोठे तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. ओढ्यात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ओढ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. ओढ्याच्या काठावर असलेल्या शेतात, वस्तीत पाणी शिरल्याने खुप नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकर्यांची कोट्यावधी रुपयांची शेतजमीन व माती, ताली, बांध, पाईपलाईन, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, गाई म्हशी गोठे, खताचे उकिरडे, शेळ्या मेंढ्या यांचे परडे, कोंबड्यांची खुराडी, शेतीची अवजारे, हत्यारी, पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. गिरवीतील हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. टँकरने पाणी देऊन जगवलेली पिके महापुरात वाहून गेल्याने शेतकर्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे.
गिरवी परिसरात शेतकर्यांना सरसकट विना पंचनामा नुकसानभरपाई द्यावी. खरीप हंगामातील पेरणीपूर्वी शेतकर्यांना एकरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने बॅक खात्यात जमा करावी, अशी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. पावसामुळे शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.