
स्थैर्य, सातारा, दि. 28 सप्टेंबर : सातारा शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी पावसाच्या मुसळधार सरी मुळे पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. कोयना, वीर, धोम धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना व निरा नद्यांची पुन्हा पाणी पातळी वाढू लागली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पहाटेपर्यंत जोरदार पावसाच्या सरी पडल्या. रविवार बाजाराचा दिवस असल्याने सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर विक्रीसाठी बसणार्या व्यापार्यासह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत होते. वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सध्या खरीप हंगामातील अगाप पिकांची काढणी ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र अधूनमधून पडणार्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जोरदार कोसळणार्या पावसामुळे कृष्णा, वेण्णा, कोयना, निरा नदीला पूर आल्याने नद्यांनी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. महापूर येऊन नदी व ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले. खटाव तालुक्यातील गोरेगाव-अंबवडे पुलावरून एकजण वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच पडझडीच्या घटनाही घडल्या. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिल्ह्यात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम, येरळा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला. खटाव व माण तालुक्यात या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. म्हसवडमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे मोठी हानी झाली. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहिले. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. खटाव तालुक्यात येरळेला महापूर आला असून अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले.
कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळी, निरा या नद्या पुन्हा दुथडी भरून वाहत आहेत. सातार्याजवळ संगम माहूली येथील घरात पावसाचे पाणी शिरले. सातारा शहरातील राधिका रस्त्यावरील अयोध्यानगरी येथील सरंक्षक भिंत पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पोवई नाका परिसरातील अजिंक्य कॉलनी येथे झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा, कडधान्ये पिके काढणीस आली आहेत. मात्र पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी तळी निर्माण झाली आहेत. ही पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.