स्थैर्य,अमरावती, दि.१५: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात थंडी कमी होताना जाणवत आहे. त्यासोबत वातावरणात बदल होताना देखील दिसत आहे. मागिल काही दिवसात वेस्टन डिस्टर्बनमुळे संपुर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवत होती. वेस्टन डिस्टर्बनचा प्रभाव कमी होत असताना दक्षिणेकडुन वारे वाहनेे चालू झालं आहे. त्यामुळे विदर्भासह इतर भागात देखील तापमान वाढत आहे.
मध्य महाराष्ट्रात 900 मीटर उंचीवर वाहत असलेले चक्रावाती वारे आणि केरळपर्यत तयार झालेली कमी दाबाची स्थिती यामुळे विदर्भात 16 आणि 17 फेब्रुवारीला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपिठीची शक्यता हवामान तज्ञ अनिल बंड यांनी वर्तवली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रालगत आलेल्या चक्रवातामुळे पुण्यात 16 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरण राहणार असुन 18 फेब्रुवारीला हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर मुंबई आणि कोकणात 16 ते 18 फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहिल. तर राज्यातील विविध भागांमध्ये 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान दुपारनंतर वादळी पाऊस होऊ शकतो.
16 फेब्रुवारीला पुर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा या भागात पाऊसाची शक्यता आहे. तर 18 फेब्रुवारीला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.