
दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। सातारा । वळिवाच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि धुवादार पावसाने तब्बल दोन ते अडीच तास धुमाकूळ घातला, यामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. अनेक दुकान, घरांमध्ये पाणी शिरले. सायंकाळपर्यंत पावसाची पिरपिर सुरुच राहिल्याने जनजीवन ठप्प झाले होते.
शहरांमध्ये बुधवारी दुपारी दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाला पावसाच्या सरी तसा सकाळपासूनच कोसळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुपारनंतर पावसाने वेग घेतला गोडोली येथील साईबाबा मंदिर परिसरामध्ये पुन्हा दुसर्या दिवशी काही घरांमध्ये व व्यावसायिकांच्या दुकानात पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाले. पालवी चौकातील भैरवनाथ सोसायटीमध्ये काही घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले. सदरबझार येथील कुरेशी गल्लीमध्ये धुवादार पावसाने तब्बल दोन ते अडीच तास सातार्यात धुमाकूळ घातला. यामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. घरांमध्ये पाणी शिरून दलदल तयार झाली. तर भवानी पेठ येथे राजलक्ष्मी थिएटरच्या पिछाडीला एका ठिकाणी संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले. सदर बझार येथील कोषागार कार्यालयाच्या रस्त्यावर झाड एका कारवर कोसळून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शाहू चौकामध्ये चार भिंतीवरून येणार्या पाण्यामुळे दगड गोटे तसेच सर्व राडारोडा वाहून आल्याने तेथे दलदल तयार झाली.
सातारा पालिकेने आपत्कालीन परिस्थितीसाठी 25 कर्मचार्यांचे पथक तैनात केले असून त्यांना युद्ध पातळीवर कामे नेमून देण्यात आलेले आहेत. प्राधान्य क्रमाने सातार्यातील सात ओढ्यांचे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे ते पाणी हटवणे हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रस्त्याचा समतोलपणा हरवल्याने पाणी साचून राहत असून विसावा नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे तळ्याचे स्वरूप आले आहे. देवी कॉलनी ते साईबाबा मंदिर रस्त्यावर पहिल्याच पावसामध्ये काही ठिकाणी रस्त्याचे अस्तर उघडल्याने खड्डयांची यात्रा सुरू झाली आहे.
सातारा-लोणंद मार्गावर झाडे कोसळली
शिवथर परिसरात बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात सातारा-लोणंद महामार्गावर सातारा तालुक्यातील वाढे आणि शिवथर येथे दुपारी झाडे पडल्याने, वाहतूक एक तास ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शिवथर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच दुपारी 3 च्या सुमारास सातारा-लोणंद मार्गावर वाढे येथील प्रभात बेकरीच्या पुढील वळणावर आणि शिवथर येथे काटवडी ओढा नामक शिवारातील भले मोठे झाड पडले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाली नाही. झाडे पडल्याने या मार्गावर साताराकडून लोणंदच्या दिशेने लोणंदवरुन सातारच्या दिशेने येणार्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याचे समजतात सातारा तालुका पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गोरे आणि कर्मचारी दाखल झाले. पोलीस आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून, एका तासाने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. पुणे, बारामती, अहिल्यानगरला जाणारा हा प्रमुख मार्ग असून, त्याचबरोबर टोल वाचवण्यासाठी या मार्गावरुन अवजड वाहतूक होत असते. या मार्गावर दिवसरात्र मोठी वाहतूक असते. त्यामुळे अशा घटना घडल्यास प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
कोयनेत दमदार पाऊस
24 तासांत 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढत असून गडद ढगांची सततची उपस्थिती आणि विजांच्या कडकडाटासह सरी चालू आहेत. यामुळे कोयना धरणाच्या साठ्यात वाढ होऊन सध्या 16 टीएमसी पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी ’यलो अलर्ट’ जारी केला असून, कोयना खोर्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे काही भागांत धुके निर्माण झाले असून वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे.