
दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। विडणी । गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आज पुन्हा एकदा फलटण शहर व ग्रामीण भागास पावसाने पुन्हा एकदा झोडपले.
या पावसाने जवळपास सर्वच ओढ्या- नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान फलटण आसू रस्त्यावरील मांगोबामाळ, विडणी ओढ्याला मोठा पूर आला असून पर्यायी पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे फलटण आसू रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे. या ओढ्यावरील नवीन पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असताना वाहतुकीसाठी तात्पुरत्या तयार केलेल्या पुलावरून पर्यायी वाहतूक सुरू होती.
ऐन उन्हाळ्यात अनपेक्षितपणे गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धुवाधार सुरुवात केली. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या विडणी, पिंपरद, सांगवी मार्गे या मार्गाने वाहतूक होत आहे.