माण, खटाव तालुक्यात पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान


माण तालुक्यात जोरदार पावसाने वाहून गेलेले रस्ते.

स्थैर्य, सातारा, दि. 21 सप्टेंबर : कुकुडवाड (ता. माण) येथील डेंगरी भागात रात्री ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे कुकुडवाड परिसरातील ओडे, नाले दुथडी भरून वाहू लागले, म्हसवड मायणी या रहदारीच्या रस्त्यावरील कुकुडवाड घाटातील पश्चिम दिशेतील जननी ओक्यास पूर येऊन या ओकावरील साकवनजीकचा रस्ता खच्चून वाहून गेल्यामुळे काल रात्रीपासून मा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील पिकांत पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले. माण ,खटाव दुष्काळी तालुक्यात पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
माण तालुक्यातील कुकुडवाड येथे रस्ता वाहून गेला आहे. यामुळे म्हसवड ते मायणी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मायणी, कान्हरवाडी, हिवरवाडी, कलेढोण, पडळ, विखळे, हिवरवाडी, कानकात्रे व परिसरात रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे चांद नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली, तर येरळवाडी तलावाशेजारील भागातही जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे येरळा नदीला पूर आला. या दोन नद्यांच्या पुरामुळे मायणी कानकात्रे- म्हसवड व मायणी निमसोड-औंधकडे जाणार्‍या मार्गावर मोराळेनजकीचा पूल व छोटे-मोठे साकव पाण्याखाली गेले. माण तालुक्यातील कुकुडवाड घाटात रस्ता वाहून गेला. या पावसामुळे शेतातील ऊस, मका, आले, बटाटा, कांदा, उडीदसारखी पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले.


Back to top button
Don`t copy text!