
स्थैर्य, मुंबई, दि. २८ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात दि. २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (SEOC) जारी केलेल्या या सूचनेनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तसेच, घाट परिसरात दरडी कोसळण्याची आणि नद्यांच्या पातळीत अचानक वाढ होऊन ‘फ्लॅश फ्लड’ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व जिल्हा प्रशासनांना आणि जिल्हा परिषदेच्या नियंत्रण कक्षांना २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सखल भागातील पाणी उपसण्यासाठी पंप तयार ठेवणे, धोकादायक इमारतींमधून लोकांना सुरक्षितस्थळी हलवणे, तसेच रस्ते आणि वीजपुरवठा बाधित झाल्यास तातडीने दुरुस्तीसाठी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
शासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
- पूर प्रवण क्षेत्रात, तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.
- नदी किंवा नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.
- विजा चमकत असताना झाडाखाली आसरा घेऊ नये.
- प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये.
- सातारा जिल्ह्यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक ०२१६२-२३२३४१ हा कार्यान्वित करण्यात आला आहे.