दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा, वाई शहराला, पुणे सातारा महामार्गाला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज गुरुवारी दुपारनंतर वातावरणात बदल होत दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. मेघगर्जनेसह मोठा मुसळधार झाला. यामुळे महामार्गावर, उड्डाणपुलावर आणि सखल भागात पाणी साठले.
आज दुपारनंतर सातारा वाई शहर, तालुका व महामार्ग परिसरात मुसळधार पाऊस झाला. वेळे, सुरुर, कवठे, भुईंज आदी परिसरातही पाऊस झाला. आजच्या पावसाने महामार्गावरील व सातारा शहर हद्दीतील वाढेफाटा उड्डाणपूलावर एक फुटापेक्षा जास्त पाणी साठुन राहिले. महामार्गावरही पाण्याची मोठी डबकी झाल्याने वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागली. यामुळे महामार्गावर वाहतूक संथ परंतु धिम्या गतीने सुरु होती.
या पावसाने सातारा शहरातील प्रमुख रस्ते हे मोकळे झाले होते. कामासाठी रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांनी आडोसा शोधला. तसेच सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून या पावसाचे पाण्याचे लोट वाहताना दिसत होते. बुधवारी दुपारनंतर जोराचा पाऊस झाला त्यानंतर वातावरण बदलले. सकाळी आज कडकडीत ऊन पडले होते. मात्र दुपारनंतर सलग दुसऱ्या दिवशी या जोरदार पावसाला सुरुवात झाली. एकंदरीतच मागील पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने हा जोराचा सुर सलग दोन दिवस लावून झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली आहे. अनेक सखल भागात व शेतामध्ये, पाणी साचून राहिल्याने उगवुन आलेल्या धान्याला त्याचा मोठा फटका बसणार आहे. पाणी साचून राहिल्यामुळे उगवुन आलेली रोपे कुजून जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. विशेषतः सोयाबीन, मका, ज्वारी आधी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सायंकाळी महामार्गावरील उड्डाणपुलावरील पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पाचगणी महाबळेश्वर येथे सायंकाळ पर्यंत पाऊस नव्हता.