
स्थैर्य, सातारा, दि. 20 ऑगस्ट : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून उघडीप दिलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत जोरदार सुरुवात केली आहे. कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम व तारळी या धरण क्षेत्रात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या पाचही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. वेधशाळेने पुढील चार दिवस सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट दिल्याने प्रशासनहीसतर्क झाले आहे.
जून महिन्याच्या मध्यान्हापासून जिल्हाभरात मॉन्सूनचा पाऊस सुरू झाला. जून महिन्याचा शेवटी पावसाचा जोर ओसरला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाची संततधार पुन्हा सुरू झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली होती. गेल्या दोन आठवड्यांच्या उघडिपीनंतर पावसाने 15 ऑगस्टपासून जोरदार सुरुवात आहे.
केली. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून, जिल्ह्याभरातील प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकरी समाधानी झाला असून, ऊस, आले, सोयाबीन या पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. धोम धरणातून सात हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. कण्हेर धरणातून विसर्गात वाढ करून चार हजार क्युसेक विसर्ग वेण्णा नदी पात्रात करण्यात आला आहे. धोम धरणातून पाच हजार 106 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तारळी धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी तारळी धरणाच्या सांडव्याद्वारे एक हजार 608 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

