
दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२५ | फलटण | फलटण शहर व तालुक्यात गेल्या ५/६ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे, मात्र संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरु असल्याने उभ्या ऊस पिकांसह आगामी खरिपाच्या पेरण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वादळ, वारे, वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पहिले २/३ दिवस पावसाने हजेरी लावली त्यामध्ये वीज अंगावर पडल्याने एक गाय दगावली तर नारळाच्या झाडाने पेट घेतला आहे, त्यानंतर गेले २/३ दिवस संतत धार मात्र वादळ वारे वीजांचा कडकडाट ढगांच्या गडगडाशिवाय पाऊस कोसळत असल्याने या भीज पावसाचा विहिरीतील पाणी वाढण्यास आणि जमिनीत पाणी मुरल्याने आगामी खरीप पिकांना त्याचा चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
नीरा उजवा कालव्याला गत सप्ताहात माळशिरस तालुक्यात पडलेले मोठे भगदाड दुरुस्त करुन कालवा पूर्ववत सुरु करण्यात यश आल्याने गेल्या २/३ दिवसांपासून सांगोला, पंढरपूर भागात कालव्याचे पाणी सुरु असल्याने ऐन पावसाळ्यात कालवा समोरुन पूर्ण क्षमतेने भरुन वाहत असल्याने फलटणकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत, तथापि पाणी पंढरपूर सांगोला भागात सुरु असून आगामी ५ जूनच्या दरम्यान कालवा बंद होईल अशी अपेक्षा आहे.
संतत धार पावसाने तालुक्यातील ओढे, नाले भरुन वाहत असून पाझर तलाव, ग्राम तलाव, पाटबंधारे तलावात पुरेसा नसला तरी समाधानकारक पाणी साठा झाला आहे. काही तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत.
वारुगड डोंगरावर २ दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस झाल्याने गिरवी, धुमाळवाडी भागातील ओढ्या नाल्यांना प्रचंड पाणी आले, धुमाळवाडी तलाव तुडूंब भरला असून त्यातून निरगुडी, सासकल, भाडळी भागातील तलावात पाणी साठे वाढत आहेत.
पाडेगाव ते आसू या बागायती पट्ट्यात ही भरपूर पाऊस झाला असून उभ्या ऊस पिकांसह चारा पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे, तर वापसा येताच या भागात ऊसाच्या लागणी सुरु होतील अशी अपेक्षा आहे.
खरिपाच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी तयार करुन ठेवल्या असल्याने वापशा नंतर खरीप पेरण्या ही वेग घेतील अशी परिस्थिती आहे.
दरम्यान संतत धार पावसाने जुनी घरे, जुने वाडे यांच्या भिंती काही ठिकाणी पडल्याने तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी अशा धोकादायक भिंती उतरुन घेण्याचे आवाहन करताना कोणी अशा धोकादायक ठिकाणी वास्तव्य करु नये, अतिवृष्टीच्या इशारा देण्यात आला असल्याने शक्यतो कोणी महत्वाच्या किंवा तातडीच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासात फलटण तालुक्यात सरासरी २० मि.मी. आणि एकूण ९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
फलटण तालुक्यात महसूल मंडल निहाय आज सकाळी संपलेल्या २४ तासात झालेला पाऊस व कंसात एकूण पाऊस खालीलप्रमाणे फलटण २४.३ मि.मी. (११४.७ मि.मी.), आसू ४.८ मि.मी.(४२ मि.मी.) होळ १६.५ मि.मी.(६९.१ मि.मी.), गिरवी १५.८ मि.मी.(१२९.१ मि.मी.), आदर्की ३७.० मि.मी. (१२४.२ मि.मी.), वाठार निंबाळकर १२.५ मि.मी.(८१.४ मि.मी.), बरड १६ मि.मी. (६८.६ मि.मी.), राजाळे २१.५ मि.मी. (९७.४ मि.मी.) तरडगाव ३७.८ मि.मी. (१०६.६ मि.मी.), कोळकी १४ मि.मी.(७१.३ मि.मी.).
दरम्यान तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, काही भागात गेल्या २/३ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने जनावरे व लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पीठ गिरण्या बंद असल्याने दळनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.