दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । खंडाळा | खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी मुसळधार पावसाने तब्बल दिड तास अक्षरशः थैमान घातले. यावेळी जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शिरवळमधील मुख्य रस्त्यांसहित महामार्गावरील सातारा ते पुणे जाणाऱ्या रोडवरील सर्व्हिस रस्त्यावरील अपूर्ण कामांमुळे दुकानांमधून व घरामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतामधील टोमॅटोसह सोयाबीन पिकाची नासधूस झाली आहे. शिरवळला गेल्या 24 तासांमध्ये 84.2 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
शिरवळसह परिसरात आज रविवार दि. 7 ऑगष्ट रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विजांच्या कडकडाटासह दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर जोरदार अतिवृष्टी होत तब्बल दिड तास अक्षरशः पावसाने शिरवळकरांना झोडपून काढले. यावेळी शिरवळकरांसह भाजी मंडई, शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिक,शेतकरी बांधवांसह अनेकांची ञेधातिरीपीट उडाली.यावेळी जोरदार पावसामुळे तसेच शिरवळमधील सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे व अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात गटारे व चेंबर तुंबत पाणी साचत महामार्गावरील रस्ते जलमय होत गटारे तुडुंब भरत महामार्गालगत असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर शिरवळमधील भूयारी गटारांचे चेंबर शिरवळ ग्रामपंचायतच्या गलथान व मनमानी कारभारामुळे तसेच घाणीमुळे बंद होत मेनरोडसह विविध ठिकाणी पाणी जमा होत अक्षरशः नाल्याचे स्वरुप प्राप्त होत अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरल्याने साहित्यांचे नुकसान झाल्याने व्यापारी बांधवांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला आहे. यामध्ये महामार्गालगत असणाऱ्या विक्रम नेवसे यांच्या मालकीच्या श्री गणेश ग्लास हाऊस याठिकाणी पावसाचे पाणी शिरत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शिरवळ माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल राऊत यांच्या शेतामध्ये तर महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे तर पंढरपूर फाटा याठिकाणी शिरवळ ग्रामपंचायतच्या गलथान कारभाराचा फटका शांतिसागर सोसायटीतील रहिवाश्यांसहित शिरवळचे माजी सरपंच दत्तम कुंभार यांच्या घरातील रहिवाश्यांना नाक दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असून स्टार सिटीच्या सांडपाणी पाईपलाईनचे काम शिरवळ ग्रामपंचायतने अपूर्ण ठेवल्याने अक्षरशः पावसाचे पाणी त्याठिकाणी जमा होत रहिवाश्यांना राहणे मुश्किल झाले असून पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्याचप्रमाणे शिरवळमधील मेनरोडवरील वैदय बिल्डींगसह अनेक दुकानांमध्ये पावसामुळे पाणी शिरत अनेकांना नुकसान सहन करावा लागला असून आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत टाँमेटो,सोयाबीन,भात पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे हातचे पिक जाण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकरी चिंतातूर झाले आहे.