दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । सातारा । युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्ह या निकषामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस घटक म्हणून सातारा जिल्हा पोलिस दलाची निवड झाल्याबद्दल गृहराज्य मंत्री ना. शंभुराज देसाई यांच्यावतीने पोलिस दलाचा सत्कार करण्यात आला. ना. देसाई यंाच्याहस्ते प्रातिनिधीक स्तरावर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतूक करताना ना. देसाई यांनी जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल मनापासून समाधानी असल्याचे गौरवोद्गार काढले.
सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या प्रातिनिधीक सत्कारप्रसंगी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. देसाई म्हणाले, हा सत्कार प्रातिनिधीक स्तरावर दोन अधिकार्यांचा असला तरी संपूर्ण पोलिस दलाचा सत्कार आहे. त्यासाठी इतर कोणत्याही शासकीय बैठकांदरम्यान सत्कार करण्यापेक्षा खास याठिकाणी येवून सत्काराचे मी आयोजन केले. मंत्री म्हणून आम्ही एखादा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतो. तथापि, या प्रकल्पांची अंमलबजावणी कशी होते, त्यावर त्याचे यश अवलंबून असते. याबाबत मी सातारा आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांबाबत समाधानी आहे कारण दोन्ही जिल्ह्यांना बक्षिस मिळाले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीबाबत मनापासून समाधान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, ना. शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवले असून युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्ह या निकषामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस घटक म्हणून सातारा जिल्हा पोलिस दलाची निवड ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले.
अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हे अभिमानास्पद वाटत असल्याचे नमूद करत यापुढेही जिल्हा पोलीस दलाचा नावलौकिक राज्यात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी विविध विभागाचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.