सामाजिक कार्यकर्ते कै. राजेंद्र भागवत यांना गोखळीत शोकसभेतून भावपूर्ण आदरांजली

विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जागवल्या आठवणी; कार्याचा केला गौरव


स्थैर्य, गोखळी, दि. ०७ सप्टेंबर : गोखळी, ता. फलटण येथील भूषण, विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे राजेंद्र दिनकर भागवत यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी गोखळी येथे आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. गणेश महाराज फडतरे यांच्या प्रवचनाने उपस्थितांना कै. भागवत यांच्या संस्कारी कार्याची आठवण करून दिली. यावेळी डॉ. शिवाजी गावडे यांनी कै. राजेंद्र भागवत यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “राजेंद्र भागवत यांच्यासारखे समाजासाठी झटणारे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे शक्य नाही.”

कै. भागवत यांनी हनुमान माध्यमिक विद्यालय, गोखळी येथे ४३ वर्षे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सेवा बजावली. यासोबतच सातारा जिल्हा बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष आणि फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. ‘सकाळ’, ‘पुढारी’, ‘तरुण भारत’, ‘ऐक्य’ यांसारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी अन्यायाविरोधात परखड लेखन केले.

या शोकसभेत मारुती गावडे, बजरंग गावडे, बजरंग गावडे, डॉ. अनिल जगताप, सातारा जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन संजय बाचल, निंबाळकर (राजाळे), ग्रामसेवक सुनील पवार, गंगाराम गावडे, ह.भ.प. अशोक घाडगे महाराज, विजय केंगार, आबासाहेब मदने, त्रिंबक बाराते, शाहीर प्रमोद जगताप, प्रसाद जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी कै. भागवत यांचे चिरंजीव एस.टी. वाहक योगेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक रुपेश भागवत, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भागवत आणि त्यांच्या परिवारासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राधेश्याम जाधव यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!