स्थैर्य, नवी दिल्ली, दि.४: केंद्रीय
मंत्री रामविलास पासवान यांच्या हृदयावर दिल्लीतील रुग्णालयात शस्त्रक्रिया
पार पडली. त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
येत्या काही आठवड्यांमध्ये रामविलास यांना पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला
सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचेही चिराग यांनी सांगितले.
‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांवर
उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री उशीरा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया
पार पडली. गरज पडल्यास येत्या काही आठवड्यांमध्ये पुन्हा एक शस्त्रक्रिया
करावी लागणार आहे. या अडचणीच्या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे
राहिल्याबद्दल सर्वांचे आभार,’ अशा आशयाचे ट्विट करत चिराग यांनी माहिती
दिली.
शनिवारी एलजेपी आणि भाजपमध्ये
जागावाटपासंदर्भात बैठक होणार होती. मात्र, पासवान यांच्या प्रकृतीमुळे ती
पुढे ढकलण्यात आली. याबाबत चिराग यांनी यापूर्वीच कल्पना दिली होती, तसेच
पक्षातील नेत्यांना पुढील तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.