
दैनिक स्थैर्य । 10 मार्च 2025। सातारा । जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार, आणि आवश्यकता असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून, त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 84 मुलांची टूडी ईको तपासणी करण्यात आली. त्यातील 20 गरजू मुलांवर आवश्यक हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून, त्यामध्ये व्यग्र असतानाही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील हृदयविकार असलेल्या मुलांची तपासणी आणि उपचार करण्याबाबत प्रशासनाला सूचना करून, शिबिराचे आयोजन केले. त्याचबरोबर त्यांनी खारघर येथील सत्यसाई हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा करून तेथील वैद्यकीय पथक जिल्हा रुग्णालयात बालकांच्या तपासणीसाठी पाठवले. या पथकामध्ये डॉ. जयश्री मिश्रा, डॉ. हृषीकेश वडके, डॉ. सई पाटील, डॉ. गायत्री, समन्वयक सागर सावंत आणि नर्सिंग स्टाफचा समावेश होता. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, डॉ. मधुरा पाटील, डॉ. राहुल यादव, हेमा बाबर, आर्या पेंढारकर, डीपीएस फर्झाना यांचे सहकार्य मिळाले.
या शिबिरामध्ये एकूण 84 मुलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 20 मुलांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय पथकाने निश्चित केले. या मुलांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. संबंधित मुलांवर शस्त्रक्रिया आणि आवश्यक असलेले पुढील उपचार तातडीने होण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकार्यांना दिली आहे.