दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । सातारा । साताऱ्यातील आठ पैकी वाई, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर आणि मेढा या सहा पालिकांच्या प्रभाग रचनेवर आलेल्या तीस हरकती, सूचना आणि आक्षेपांवर आज साताऱ्यामध्ये प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पालिकांचे जिल्हा प्रशासनाधिकारी अभिजित बापट व पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. आता या नागरिकांच्या हरकती योग्य त्या शिफारशींसह शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.
साताऱ्यातील पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना तयार करून त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावर प्रभागांच्या सीमा, प्रभाग रचना, हरकती, आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावर नागरिक, माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून हरकती घेण्यात आल्या होत्या.
फलटण (८), रहिमतपूर (१०), मेढा(१) वाई (७), पाचगणी (२), महाबळेश्वर (२) असे एकूण तीस हरकती व सूचना आणि आक्षेप आले होते. पालिकांनी या हरकती व सूचना साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणल्या होत्या. आज यावर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पालिकांचे जिल्हा प्रशासनाधिकारी अभिजित बापट, पालिकांचे मुख्याधिकारी संजय गायकवाड (फलटण), किरणकुमार मोरे (वाई), पल्लवी भोरे-पाटील (महाबळेश्वर), गिरीष दपकेकर (पाचगणी), अमोल पवार (मेढा), संजीवनी दळवी (रहिमतपूर) उपस्थित होते. आता सुनावणीनंतर नागरिकांच्या हरकती सूचना आक्षेप योग्य त्या शिफारशींसह शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. यावर शासन पातळीवर निर्णय होऊन तो जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पालिकांना कळविण्यात येणार आहे. सातारा व कराड पालिकांची सुनावणी सोमवार (दि २३) रोजी होणार आहे.