स्थैर्य, दुधेबावी, दि. २८ : करोना नियंत्रणासाठी शासन, ग्रामपंचायत आणि करोना स्थानिक समितीच्या माध्यमातून गावात राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजना उपयुक्त ठरत असून ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिलेल्या मशिनरीच्या आधारे गावातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य विषयक सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच मधुकर वावरे यांनी दिली आहे.
तपासणीमध्ये कमी/जास्त प्रमाण आढळल्यास वैद्यकीय तपासणी होणार
थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सि मीटरच्या माध्यमातून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी होणार असून त्यापैकी थर्मल स्कॅनर मशीनद्वारे ग्रामस्थांच्या शरिरातील तापाचे प्रमाण, पल्सऑक्सिमीटर द्वारे ग्रामस्थांच्या हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासता येणार असून नॉर्मल व्यक्तीच्या शरीरातील तापमान, हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण किती असते याची माहिती तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून एकाद्या ग्रामस्थाच्या शरीरातील हे प्रमाण कमी/जास्त आढळल्यास अशा ग्रामस्थांना तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सांगितले.
आरोग्य अधिकारी वैद्यकीय सेवेसाठी सज्ज राहणार
अशा प्रकारे वैद्यकीय सर्वेक्षण केल्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी/कर्मचारी सर्व ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी करण्यात गुंतून न पडता संशयीत रुग्णांची तपासणी करुन त्यांना तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार सुरु करणे शक्य होणार असल्याचे सरपंच मधुकर वावरे यांनी निदर्शनास आणून दिले, त्यासाठी ग्रामपंचायतीने सदर मशिनरी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.
नोंदीमध्ये तफावत आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेणार
संपूर्ण दुधेबावी गावात ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा सेविका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दुधेबावी शाखेत ही मशीन ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा बँकेत गर्दी झाल्यानंतर किंवा बँकेत येतानाच थर्मल स्कॅनर मशीनने बँकेेेत आलेल्या ग्राहकांची तपासणी करण्यात येणार असल्याने एकादा संशयीत ग्राहक आढळल्यास त्याला तातडीने डॉक्टर कडे पाठविण्यात येणार आहे, तसेच आशा सेविका, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांचे कडील मशीनद्वारे गाव व वाडीवस्तीवरील ग्रामस्थांची तपासणी करुन त्याच्या नोंदी ठेवण्यात येणार आहेत, दुसऱ्या राउंडचे वेळी तपासणी करताना संबंधीत ग्रामस्थांचे आरोग्य विषयक नोंदी मध्ये तफावत आढळल्यास त्याबाबतही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाणार असल्याचे उप सरपंच भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले आहे.
करोना नियंत्रणासाठी ही यंत्रणा उपयुक्त
ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिलेल्या या साधनांचा उपयोग करुन दुधेबावीत करोना पोहोचणार नाही इतपत व्यवस्था करता येऊ शकेल त्यासाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाने घालुन दिलेल्या नियम/निकषांचे काटेकोर पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व दुधेबावीचे पोलीस पाटील हणमंतराव सोनवलकर यांनी केले आहे
ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिलेली ही मशिन्स सरपंच मधुकर वावरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी बँकेचे अधिकारी, आशा सेविका आणि ग्रामसेवक यांचेकडे सुपूर्द केली त्यावेळी माणिकराव सोनवलकर, भाऊसाहेब मोरे, हणमंतराव सोनवलकर, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, करोना स्थानिक समिती सदस्य उपस्थित होते.