
स्थैर्य, मुंबई, दि. १४ : भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. रुग्णालयातील यंत्र सामुग्री दुरुस्त करुन रिक्त पदे त्वरित भरावीत, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
मंत्रालयात भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार रईस शेख, माजी आमदार रशिद ताहीरवाला, आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी, भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज आशिया, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, डॉ.सतीश पवार, ठाणे आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, या रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत. या रुग्णालयात अतिरिक्त उपकरणे उपलब्ध करुन देतानाच यंत्र सामुग्रीची तातडीने दुरुस्ती करावी. रिक्त जागा भराव्यात. रुणालयामध्ये लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध करुन द्यावेत. हे रुग्णालय नॉन कोविड करुन तेथे इतर रुग्णांना उपचार देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही श्री. टोपे यांनी यावेळी दिल्या.