आरोग्य हीच खरी संपत्ती आहे – डॉ. प्रसाद जोशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.१८: आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते.’सिर सलामत तो पगडी पचास ‘ ही कहावात हिंदी मध्ये प्रचलित आहे.आरोग्य उत्तम असणे ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. तर हे आरोग्य म्हणजे नक्की काय? तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. आता प्रत्येकात थोडे डोकावूया

१ शारीरिक स्वास्थ्य :-
माणसाचे शरीर ही एक त्याला मिळालेली दैवी देणगी आहे . ते हाडा मासांनी आणि पेशींनी बनलेले आहे. त्यात बऱ्याच सिस्टिम्स आणि त्याच्याशी संबंधित अवयव आहेत की ज्याचे कार्य उत्तम असल्यास शारीरिक आरोग्य उत्तम राहते.
शरीर हे नाशवंत आहे त्यामुळे त्याला जर टिकवायचे असेल तर त्याची रोजच्या रोज मशागत करणे जरुरीचे आहे. जशी एखाद्या गाडीचे servicing करायचे राहिले तर ती केव्हाही बंद पडू शकते तसेच आपल्या शरीराची ताकद ही अबाधित ठेवायची असेल तर त्याची मशागत आवश्यक आहे.
मग ती कशी करावी-

-नित्यनियमाने रोज अर्धा ते एक तास व्यायाम करा, मग तो कुठलाही असो सूर्यनमस्कार , योगासने , प्राणायाम , jogging, Running, Swimming, मैदानी खेळ(खोखो , कबड्डी , फुटबॉल, हॉकी , रग्बी, क्रिकेट). व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे . व्यायामामुळे माणसाच्या अंगात स्फूर्ती व चेतना येते. आपले शरीर लवचिक होते व आपली रोग प्रतिकार-शक्ती वाढते. व्यायाम केल्यामुळे अंगात काम करण्याचा उत्साह , ताकत वाढते आणि स्फूर्ती वाढते.

-रोज भरपूर पाणी प्या .
पाणी हेच जीवन आहे. आपल्या प्रत्येक पेशीत ८०% पाणी आहे. साधारण पणे प्रत्येकाने रोज फिल्टर केलेले अथवा शुद्ध पाणी २ ते ३ लिटर प्यावे. पाणी केव्हा आणि किती प्यावे यालाही महत्व आहे. सकाळी उठल्यावर दात न घासता एक भांड- भर कोंबट पाणी प्यावे . जेवणाच्या आधी अर्धा तास व जेवल्यानंतर १ तासाने एकावेळेच साधारण २०० ते ३०० ml पाणी प्यावे. पाणी गटा गटा पियू नये ते हळूहळू प्यावे. पाणी बसून प्यावे उभा राहून पिल्यास गुढघे दुखतात असे म्हणतात.

-सकस व पौष्टीक आहार घेणे ही उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. घरी शिजवलेले , ताजे आणि पौष्टीक जेवण घेणे इष्ट. जेवणाच्या वेळा पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. कितीही काम असले तरी वेळच्या वेळी जेवण करणे हे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फार आवश्यक आहे. सकाळचा नाष्टा राजासारखा , दुपारचे जेवण प्रधानजी सारखे आणि रात्री चे जेवण भिकार्यासारखे करावे .
नेहमीच दोन घास कमी खावे .
प्रत्येक घास हा चावून चावून त्याचा आस्वाद घेत खावा.
शक्यतो मांसाहार टाळावा कारण आपली पचनसंस्था ही मांसाहार खाण्यासाठी बनलेलीच नाही हे प्रत्येकांनी जाणून घेणे गरजेचे आहे .

– विश्रांती घ्या .
८ तास शांत झोप घेणे पण महत्वाचे आहे. शरीराला विश्रांतीची गरज असते विश्रांती नंतर शरीर परत ताजे-तवाने होऊन उत्स।ही

२. मानसिक स्वास्थ्य :-
मानसिक स्वास्थ्यासाठी मनाची मशागत करणे जरुरीचे आहे .
माझे मन परिस्थितीच्या अधीन होते. परिस्थितीला मी अधीन करू शकत नाही, हे सत्य आहे. आणि यावर आपली प्रतिक्रियाही अशी असते की हे तर स्वाभाविकच आहे. जसजशी परिस्थिती, जसजशा व्यक्ती बदलत जातील तसेच माझे विचार, माझ्या भावनाही तद्नुसार बदलत जातील. म्हणूनच आपल्याला कधी आनंदाची जाणीव होते, तर कधी दुखाची. आणि आम्ही हे सहजपणे स्वीकारतो आणि म्हणतो, की जीवन तर असंच आहे. आपण आपली मनाची शक्ती परिस्थितीला देत गेलो, परिस्थिती दिवसेंदिवस आव्हानात्मक होत गेली, सशक्त होत गेली. याचाच अर्थ परिस्थितीला आपण बलवान बनविले व आपण स्वत मात्र कमजोर झालो. यातून आनंदाची अनुभूती मिळेल? निश्चितच नाही. अशा प्रकारच्या मनस्थितीमुळे जीवनातील स्थर्य कमी झाले व अशांतता वाढली. शारीरिक स्वास्थ्याला जसे महत्त्व देणे गरजेचे आहे तसे महत्त्व मानसिक स्वास्थ्याला देतो का? जर आपण मानसिक स्वास्थ्याला ही शारीरिक स्वास्थ्याइतकेच महत्त्वाचे समजू, तेव्हाच हा जीवनप्रवास व्यवस्थितरीत्या चालू शकेल व आपल्याला आनंदही मिळेल.

डॉक्टरदेखील आपल्याला सांगतात की शारीरिक प्रतिकारशक्ती कमी असेल तर बाहेरील वातावरणाचा लागलीच शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला काही आजारदेखील होतात. त्याचप्रमाणे मानसिक प्रतिकारशक्ती कमी असेल तर बाहेरील परिस्थिती, वेगवेगळ्या घटनांचा आपल्या मनावर विपरीत परिणाम होणारच. आता मानसिक प्रतिरोधकशक्ती कशी बरं वाढेल? आपल्या शरीराला आवश्यकता असते स्थूल अन्नाची आणि मनाच्या बाबतीत म्हणाल तर मनाला गरज असते शुद्ध विचारांच्या भोजनाची. जसे शरीराला आराम हवा असतो तसाच आराम मनालाही हवा असतो. तसे शरीराला व्यायामाची गरज तशी मनालाही गरज असते व्यायामाची. अर्थात सकारात्मक चिंतनाच्या व्यायामाची.

आता समजा, पाच मिनिटांपूर्वी मला समजले की मुलांना शाळेत सोडायला जायचे आहे. त्यावेळेला मी शांत राहिले, स्थिर राहिले तर खूप गोष्टी सोप्या होतील. मला शाळेत सोडायला जायचेच आहे. गाडी पण मलाच चालवायची आहे. हे एकदा नक्की झालं की मग चिडचिड कशाला? गाडी आपण कुठल्या स्थितीत चालवणार? दुखी होऊन की आनंदी राहून? आपल्यासमोर येऊ घातलेली परिस्थिती व आपले मानसिक स्वास्थ्य दोघेही वेगळे नाहीत. यांचा खरे तर एकत्र संयोग आहे. जर मी सक्षम असेन तरच मी परिस्थिती नीट हाताळू शकतो आणि तेही आनंदी राहून, परंतु आपण आधी ही परिस्थिती स्वीकारायला तयार नसतो. नंतर तिचे निवारण कसे करता येईल हे पाहतो. मनाचा विचार, ते शांत ठेवण्याचा विचार आपण नंतर करतो. त्यामुळे परिस्थिती मनाचा ताबा घेते आणि आपण आनंदापासून दूर जातो.

“मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वि मोलाची
तू चाल पुढं तुला रं गडय़ा भीती कोणाची”
मराठी चित्रपटातील गीत यातही शुद्ध मनाबद्दल वर्णन केले आहे. शुद्ध मन म्हणजे असं मन ज्यात कुठल्याही चुकीच्या व्यर्थ विचारांना जागा नाही. केवळ सकारात्मक विचार व स्वतबद्दल व सर्वाबद्दल शुभ भावनाच आहेत. म्हणूनच तर संत महात्मे म्हणून गेलेत, मन करा रे प्रसन्न, आनंदाचे डोही आनंद तरंग, ही अवस्था आपणापासून दूर नाही. चला तर मग या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला. कारण आपणच आहोत आपल्या आनंदाचे रचनाकार. आपल्याला आता कोरोना बरोबरच अजून काही वर्ष रहावे लागणार आहे
तरी आपण आनंदी राहा ,सकारात्मक राहा , छंद जोपासा , कुटुंबासाठी वेळ द्या .

शेवटी असेच म्हणावे लागेल
“तूच आहेस तुझ्या मनाचा, जीवनाचा आणि पर्यायानी आनंदाचा शिल्पकार”

– डॉ. प्रसाद व्ही जोशी
अस्थीरोग शल्य-चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा. ली.,
फलटण


Back to top button
Don`t copy text!