दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आयुष विभाग, एन सी डी विभाग, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, आय सी टी सी कार्यक्रम व मानसिक आरोग्य विभाग यांच्यावतीने ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ ( 7 व्या आयुर्वेद दिनानिमित्त) व माता सुरक्षित तर घर सुरक्षित तसेच स्तन कर्करोग जनजागृती अंतर्गत ग्रामपंचायत सांबरवाडी व स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यांच्यामार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांबरवाडीच्या संरपंच माधुरी फडतरे होत्या.
या शिबीरामध्ये लाभार्थ्यांना रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, मानसिक आरोग्य, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योग यांच्या अनुषंगाने मोफत तपासणी, उपचार व समुपदेशन याचा लाभ देण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संजीवनी शिंदे यांनी 7 व्या आुयर्वेद दिनानिमित्त, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ या विषयी दिनचर्या, तफचर्या, ज्येष्ठांचे आरोग्य ह्या विषयी माहिती दिली. तसेच आयुर्वेद चिकित्सेचा वापर निरोगी आयुष्य जगण्यासाठी कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. रश्मी कुलकर्णी यांनी एन सी डी संकल्प निरोगी महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा, स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग याबद्दल माहिती दिली. तसेच महिला वर्गाला स्तनाचे स्वपरिक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. श्री. पुरब आनंदे यांनी योगाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद पार्टे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राहुल माने, शिल्पा बागल, अपर्णा बल्लाळ, श्रध्दा कारंडे, ईला ओतारी, सविता माने, नाजमिन शेख, रुपाली पवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास सांबरवाडी गावचे उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.