स्थैर्य, सातारा, दि.१९: खरेदी केलेल्या दस्ताची सात-बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी वीस हजारांची लाच मागून दहा हजार स्वीकारताना कोंडवे सजाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. वामन उर्फ संतोष भालचंद्र पेंडसे, वय 49, पद-तलाठी, सजा कोंडवे, रा. शाहूपुरी, सातारा असे संशयीताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिन दस्ताची सात-बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक तलाठी वामन पेंडसे याने दि. 19 ऑक्टोबर रोजी 20 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर लाचलुपत प्रततबंधक खात्याने याबाबत त्याच दिवशी पडताळणी केली करून सापळा रचला. यावेळी 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारतना पेंडसे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे)चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली व ला.प्र.वि.साताराचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या पर्यवेक्षणाखाली अविनाश जगताप, पोलीस निरीक्षक, पो. हवा.साळुंखे, शिंदे, पो.ना ताटे, खरात लाप्रवि, सातारा युनिट यांनी केली.