दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । बिल्डर आणि ठेकेदारांना खंडणी मागण्याचा धंदा कोणाचा आहे हे फलटणकरांना चांगलेच माहीत आहे. बेकायदेशीर बांधण्यात आलेले गाळे कोणासाठी बांधलेत आणि त्यात कोणाचा फायदा आहे हे न समजण्या इतके फलटणकर आडाणी नाहीत. उच्च न्यायालयात ते बेकायदेशीर कसे आहेत हे दाखविल्याशिवाय आपण गप्प बसणार नसून पांडुरंग गुंजवटे यांनी मी कोणत्या बिल्डरला अथवा ठेकेदाराला खंडणी मागितली ते पत्रकार परिषद घेऊन सांगावे व त्यामध्ये मलाही बोलवावे; असे प्रतिआव्हान फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी दिले आहे.
फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवरमधील अनियमित बांधकामाविरोधात नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेल्या आरोपावरुन पांडुरंग गुंजवटे यांनी अशोकराव जाधव यांच्या भानगडी बाहेर काढणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते. त्याला प्रतिआव्हान अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.
फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी फलटण नगरपरिषदेत आलेल्या पांडुरंग गुंजवटे यांनी प्र्रभाक क्रमांक 4 मध्ये येवून फिरावे म्हणजे त्यांना मी काय काम केले आहे ते दिसेल. आपण मलठणमध्ये काय दिवे लावलेत ते जनतेस सांगावे. पालिका निवडणूकीचे घोडे मैदान लांब नसून; हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडून येवून दाखवावे. असेही अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.