
दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । फलटण । आज बहुजन प्रतिपालक,कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांची जयंती त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा! सर्व भारतीयांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!!आजच्या दिवशी १९ फेब्रुवारी १८६९ ला रायगडावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर प्रथम पुष्प अर्पण करून शिवजयंतीस सुरवात केली.त्यांची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजाच होती.आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या समोर प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच होती म्हणूनच टॉस म्हणतो,”उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.” इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, “उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?”
रवींद्रनाथांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य प्रेरणास्थान होते. “छत्रपती शिवाजी महाराजांवर एक खंडकाव्य ही त्यांनी रचले आहे.पु.ल देशपांडे लिहितात,शिवाजी उत्सव ही रविंद्रनाथांची अत्यंत तेजस्वी कविता आहे.शिवगौरवाचा एकेक शब्द आगीच्या ठिणगीसारखा उडाला आहे.रवींद्रनाथांची रविकिरणांसारखी सप्तरंगी प्रतिभा,परंतु जेव्हा सात्विक संतापाने हा महाकवी उफाळून उठतो तेव्हा गद्य काय आणि पद्य काय ऋषिवाणीसारखे गर्जना करून उठत असते.” रविंद्रनाथ टागोरांच्या या कवितेतला काही भाग पुलंनी मराठीत अनुवादित करून लिहितात,
‘हे राज तपस्वी वीरा,
तुझी ती उदात्त भावना-भरून राहिली आहे असंख्य भांडारातून
त्यातला एक कण देखील काळाला नष्ट करता येणार नाही.’
शिवाजी उत्सव ही रविंद्रनाथांची मूळ बंगाली कविता असून त्याचे मराठी भाषांतर,
हे राजा शिवाजी,
कोण जाणे कधी काळी मराठ्यांच्या देशी
कडे कपरीतील राणी वनी अंधारात
विधूल्तेसारखी चमकून गेली तुझ्या मनात प्रतिज्ञा
विसकटलेल्या विदीर्ण झालेल्या भारत देशाला
मी स्वराज्य धर्माच्या सूत्रात जोडून घेईन
त्या दिवशी हा वंग देश झोपूनच राहिला.
नाही आला तो धावून बाहेर, नव्हता काही संदेश
नव्हता शुभंकर शंखनाद
बसले होते शांतमुखी ग्रामवासी सारे, निवांत, स्वस्थ
आणि तिकडे मराठ्यांच्या प्रांती
चेतवलेस अग्निकुंड तू
युगांतच्या क्षितिजावर विद्युत अग्निने
त्या प्रलयकारी समयी थरारला तूरा मोगलांच्या शिरपेचातल्या
एखाद्या पिकल्या पानाप्रमाणं….
हे शिवाजी राजा
हे राज तपस्वी वीरा, तुझी ती उदात्त भावना
विधात्याच्या भांडारात जतन करण्यात आली आहे.
काळाला त्याचा एक कण देखील नष्ट करता येईल का ?
तुझा प्राण यज्ञ स्वदेश लक्ष्मीच्या मंदिरातील तुझी साधना
आज भारत देशाचं रण बनली आहे युगानुयुगांसाठी
हे राज्य संन्यासा निर्झर जसा पथर विदीर्ण करून होतो जागा
तसा तू प्रकटलास दीर्घकाळ आज्ञातात राहून
सारं जग झालं विस्मयचकित
सार्याग आकाशाला भरून टाकते ज्यांची पताका
तो हा शिवराया इतका काळ इतका लहानगा होऊन
कुठं बरं झाकून राहिला होता आजवर
मी पूर्व भारतातील कवी काही अपूर्व दृश्य पाहतोय
बंगालच्या अंगणात कशी रे दुमदुमली तुझी नौबत
तीन शतकांची गाढ अंधारातील रात्र दूर सारून
कसा रे तुझा प्रताप उगवला आहे आज पूर्व क्षितिजावर
सत्य मरत नसते कधीच
उपेक्षेने वा अपमानाने, शतकानुशतकं विस्मृतिच्या तळाशी
तळपलं गेलं तरीही
हे राजन आज आम्ही तुला ओळखलं रे ओळखलं
तू तर महाराजा आहेस आठ कोटी वंगपुत्र उभे आहेत आज
तुझे राज कर आपल्या हाती घेण्यासाठी
त्यावेळी नाही रे ऐकले तुझं सांगणं
आता मात्र शिरोधार्य मानू तुझे आदेश
सारा भारत देश आता एक होईल.
तुझ्या ध्यान मंत्रावर
फडकवू आम्ही ध्वजा बनवून वैराग्याची उत्तर्याची
तेच रे आम्हा दरिद्री लोकांचे समर्थ
या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार
या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आमचे पाथेय
हे वंग वासियांनो म्हणा आज एक स्वरात मराठ्यांसह
शिवाजी महाराजांचा विजय असो….
हे वंग वासियांनो चला तर आज सजून धजून महोत्सवाला मराठ्यांसह एकत्र
आज एकाच वास्तवानी पूर्व पश्चिम एक होतील भारत देशाचे युद्धाशिवाय
करतील गौरव एका पुण्य नामाचा……एका पुण्य नामाचा
‘माराठीर साजे आजे हे बंगाली
एक कंठे बोलो,
जयतु शिवाजी….’
छत्रपती शिवरायांनी जात धर्म,पंथ याच्या पलीकडे जाऊन अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले.कोणताही भेदभाव नव्हता की अन्याय.न्याय निती आणि सदाचाराची शिकवण देणाऱ्या शिवछत्रपतींनी कायमच सर्वाना समतेची वागणूक दिली.त्यांनी प्रत्येक माणसाला सन्मान मिळवून दिला.समाजातील काही महाभाग मात्र आजीही जातीपातींच्या खुराड्यात अडकून पडले आहेत.धर्मांधांच्या चिखलात अडकून पडले आहेत.ते त्यातून बाहेर पडतील तेव्हा छत्रपती शिवरायांचा विचार समाजात रुजेल.आपण ही छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली शिकवण अंगीकारून समताधिष्ठित समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करू.जातीपाती,धर्मांधता नष्ट करून मानवता धर्मांची महाराजांची पताका अखंडित गगनी फडकवू.सर्वाना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!!
सोमीनाथ पोपट घोरपडे,प्रकल्प अधिकारी
प्रगत शिक्षण संस्था,फलटण
मो.नं : ७३८७१४५४०७
इमेल : bhimai05@gmail.com