त्यांना राजकारण कळते… म्हणत फडणवीस यांनी खडसे यांचा निर्णय ठरवला ‘योग्य’, भाजप सोडण्याच्या कथित निर्णयावर देवेंद्र फडणवीसांचा सूचक संदेश


 

स्थैर्य, जळगाव, दि.१४: माजी मंत्री एकनाथ खडसे जिल्ह्यात आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अपेक्षेप्रमाणे दूरच राहिले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभाकडे त्यांनी पाठ फिरवली. खडसेंना राजकारण चांगले कळते. त्यामुळे ते ‘योग्य’ निर्णय घेतील, असे सांगत फडणवीस खडसेंच्या पक्षांतराबाबत सूचक बोलले.

फडणवीस आणि आ. महाजन यांच्याशी असलेले खडसे यांचे संबंध लक्षात घेता खडसे समारंभाला जाणार नाहीत, अशीच शक्यता व्यक्त होत होती. त्यानुसार ते गेले नाहीत. मात्र, त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे व मुक्ताईनगर भाजपचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले. खडसे प्रकरणावर फडणवीस काही भाष्य करतात का, याची उत्सुकता होती. मात्र, त्यांनी बोलणे टाळले. नंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘नाथाभाऊंनी आमच्यासोबत राहावे ही आमची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील.’

एकनाथ खडसे मंत्री होतील; पाडवी यांचा दावा

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील आणि लवकरच मंत्री होतील, असा दावा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला. खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असा गौप्यस्फोट केल्याने उदेसिंग पाडवी चर्चेत आले आहेत. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसशी संबधित नाही. त्यांची राजकीय ताकद पाहता राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीने करावे याबाबतीत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये खलबते सुरू आहेत. त्यासाठी निष्क्रिय मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!