बडवे उत्पात हटाव आंदोलनातील हभप रामदास महाराज यांचे योगदान मोलाचे
स्थैर्य, पंढरपूर, दि. २५ : पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे प्रमुख असलेले रामदास महाराज जाधव यांच्या प्रमुख सहभागातून विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने बडवे-उत्पात हटाव आंदोलनाच्या संदर्भात पंढरपूर मध्ये कैकाडी महाराज मठामध्ये अनेकदा बैठका झालेल्या आहेत. बडवे-उत्पात हटाव आंदोलनातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांची ही प्रबोधनाची परंपरा आम्ही विसरणार नाही. ती विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे सुरूच ठेवेल.
ह भ प रामदास महाराज जाधव यांचे अकलूज येथे न्युमोनिया व ब्लड प्रेशर च्या त्रासामुळे ७७ व्या वर्षी आज सायंकाळी निधन झाले . त्यांना विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली वाहत आहोत.
वारकरी संप्रदायातील रामदास महाराज जाधव यांचे योगदान महत्त्वाचे आहे. किर्तन , प्रबोधनाच्या माध्यमातून रामदास महाराजांनी गाडगे महाराजांची अंधश्रद्धा व अनिष्ट रूढींवर घणाघात प्रहार करण्याची परंपरा ही महत्त्वाचीच आहे. त्यांनी संत गाडगेबाबांची विद्रोहाची व बंडखोरांची जी परंपरा पुढे सुरू ठेवली ती वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि त्याच परंपरेने वारकरी संप्रदाय हा अधिक बलवान होणार आहे याची विद्रोही सांस्कृतिक चळवळीला खात्री आहे. कारण वारकरी संतांनी अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरा यावर आपल्या अभंगातून प्रहारंच केलेले आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ ह-भ-प रामदास महाराज जाधव यांना अभिवादन करत आहे .