दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । राज्य सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना साताऱ्यात बंडातात्या यांनी महिला खासदार सुप्रिया सुळे, काही खासदार-आमदार यांच्याविषयी आक्षपार्ह विधान केल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली. गुरुवारी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हजर होण्यासाठी बंडातात्या स्वतः सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, सुमारे अर्धा तास त्यांची चौकशी सुरू होती.
बंडातात्या शुक्रवारी हजर होणार असल्याने सातारा शहर, सातारा तालुका पोलिस, आरसीपी पोलिसांची एक तुकडी पाचारण करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिस मुख्यालय रस्ता दुपारी १२.३० वाजता बंद करण्यात आला होता. या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली. अचानक यामुळे सातारकरांची तारांबळ उडाली. सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.