
स्थैर्य , सातारा , दि .२६: सातारा जिल्हा हॉकर्स संघटनेच्या वतीने सोमवारी चर्चेच्या निमित्ताने सातारा पालिकेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला . आळूच्या खड्डयातील जागा हॉकर्सवाल्यांनी नाकारून गांधी मैदानावरच चौपाटी ला जागा मिळावी असा हट्ट धरला .
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास गांधी मैदानावर बेमुदत उपोषण करून ३ फेब्रुवारी रोजी पालिकेसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे .
हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार , जिल्हा कार्याध्यक्ष संदीप माने , विश्वास जगताप अंकुश राजपुरे , नीलम निकम , पूनम खंडागळे , शामराव शिंदे , राजेंद्र साळुंखे असे हॉकर्स संघटनेच्या शिष्टमंडळांनी सोमवारी पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन राजवाडा चौपाटी गांधी मैदानावर पूर्ववत सुरु करावी अशी मागणी केली . आळूच्या खड्डयातील चौपाटी ची जागा अपुरी हगणदारीती ल असून व्यवसायाच्या दृष्टीने अयोग्य असल्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केली . राजवाडा चौपाटी हलविताना आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही . तसेच ही जागा तात्पुरत्या स्वरूपाची आहे , जोपर्यंत कायम स्वरूपी जागेचा निर्णय होत नाही तोपर्यंत राजवाड्यावर चौपाटी सुरु ठेवण्याचा सूर हॉकर्स वाल्यांनी आळविला . मात्र मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी गांधी मैदान राजवाडा येथे चौपाटी सुरु करण्यास परवानगी देता येणार नाही असे स्पष्टपणे बजावले .
आधीच लॉकडाऊन त्यात चौपाटी बंद यामुळे चौपाटी विक्रेत्यांची आर्थिक तंगी वाढली असून बँक कर्ज परताव्याची अडचण झाली आहे . विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार या चर्चे दरम्यान करण्यात आली . आमच्या मागण्या मान्य न झाल्यास गांधी मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येऊन ३ फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा संजय पवार यांनी दिला आहे .