
स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा जिल्हा पोलिस दलाअंतर्गंत कराड तालुका पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलिस हवालदार संताजी दादू जाधव यांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले. कराड पोलिस वसाहतीमध्ये महिलेला चिठ्ठी लिहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहेे. दरम्यान, पोलिस अधीक्षकच्या या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना एक महिन्यापूर्वी समोर आली आहे. संताजी जाधव हे कराड पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. या दरम्यान वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिस कुटुंबियाच्या एका महिलेला त्यांनी चिठ्ठी लिहली. ही घटना समोर आल्यानंतर संबंधित पोलिस असणाऱ्या कुटुंबियांनी कराडमधील वरिष्ठ पोलिसांकडे धाव घेवून तक्रार केली. कराड पोलिसांनी या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिल्यानंतर त्यांनी चौकशी लावली.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर कराडसह संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली. चिठ्ठी प्रकरण समोर आल्यानंतर पोलिस हवालदार संताजी जाधव यांच्याविरुध्द कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार तो अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आला. अहवालानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस हवालदार संताजी जाधव यांना निलंबित केले.
पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘तुमच्या वर्तनाने पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. तुम्ही तुमच्या पदास अशोभनिय लांच्छनास्पद गैरवर्तन करुन गंभीर स्वरुपाची कसुरी केली आहे.’ यामुळे सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.