पहिल्या रुग्णाची पत्नी पॉझिटिव्ह तर दोन मुलांचे अहवाल निगेटिव्ह
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. 25 (रणजित लेंभे) : वाघोली ता कोरेगाव येथिल प्रथम कोरोना बाधित व्यक्ती व त्याच्या वृद्ध मातेचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पत्नीचा अहवाल देखिल पॉझिटिव्ह आला असून सुदैवाने त्या व्यक्तीच्या दोन मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
वाघोली ता कोरेगाव या ठिकाणी दिनांक २० रोजी कोरोना बाधित व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह मुंबईहून दाखल झाला होता. ग्राम कृती समिती व आरोग्य विभाग यांनी सर्तकता राखत त्यांना कौटुंबिक विलिगिकरणात ठेवले होते. तत्पूर्वी बाधित व्यक्तीचा स्वॉब नमुना मुंबई येथे घेण्यात आला होता. परंतु संबंधित व्यक्तीने ही माहिती लपवून ठेवली होती. दरम्यान त्या रूग्नाचा अहवाल दिनांक २२ रोजी सकारात्मक आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्तीचा सकारात्मक अहवाल मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ संबंधित व्यक्तीला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रूग्णालयात तर त्यांच्या ४ निकटवर्तीयांना बह्मपुरी येथे संस्थांत्मक विलिगिकरणात हलविले होते. त्यानंतर रविवार दिनांक २४ रोजी सकाळी संबंधित कोरोना बाधित व्यक्तीच्या वृद्ध मातेचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर सायंकाळी संबंधित व्यक्तीच्या पत्नीचा अहवाल देखिल सकारात्मक आला आहे. सुदैवाने त्याच व्यक्तींच्या निकट सहवासातील प्रथम बाधित व्यक्तीच्या दोन्ही मुलांचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्याने संबंधित कुटुंबियांतील कोरोना संसर्गाची साखळी तुटल्याने प्रशासनासह परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान आरोग्य, महसूल पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने या परिसरात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.बाधित व्यक्ती वास्तव्यास असलेला परिसर केंद्रस्थानी मानून प्रस्तावित क्षेत्र प्रतिबंधित क्षेञ घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान प्रांताधिकारी किर्ती नलावडे यांनी आज परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून स्थानिक प्रशासनाकडून सद्यस्थितीची माहिती घेतली यावेळी त्यांनी लोकांनी घाबरून न जाता प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.